मुंबईत ट्रेनच्या तिकिटासारखा लसीचा कोटा संपला, लस महोत्सवाला अवघे २०० डोस

मुंबईत ट्रेनच्या तिकिटासारखा लसीचा कोटा संपला, लस महोत्सवाला अवघे २०० डोस

मुंबई महापालिकेने १ मे पासून प्रौढांसाठी लसीकरण करण्याची घोषणा केली खरी, पण हा लसीकरणाचा महोत्सव म्हणजे डोंगर पोखरून उंदीर निघाल्याचाच अनुभव अनेक मुंबईकरांना आला. महापालिकेने मुंबईतील पाच लसीकरण केंद्रावर लस ही १८ ते ४४ वयोगटासाठी देण्याचे जाहीर केले होते. पण गणपतीला किंवा उन्हाळी सुट्टीला ट्रेनची तिकिटे जशी मिनिटात संपतात, तसाच काहीसा अनुभव हा मुंबईतल्या तरूणाईला लसीकरणाच्या मोहीमेत पहिल्याच दिवशी आला. अवघ्या २०० लसींचा कोटा मुंबईतील प्रत्येक केंद्रावर देण्यात आला होता. हा कोटा क्षणाधार्थ संपला आणि लस उपलब्ध नाही असा मॅसेज पुन्हा कोविन आणि आरोग्य सेतू एपवर येऊ लागला. त्यामुळेच मोठा गाजावाजा करत लसीकरणाच्या घोषणेचा फुगा घटकेत फुटला. मुंबईत १८ ते ४४ वयोगटातील अनेकांनी प्रयत्न करूनही सुरूवातीला लसीकरण केंद्र उपलब्ध नाही असा मॅसेज अनुभवला. तर लसीकरण केंद्र उपलब्ध झाल्यानंतर मात्र क्षणाधार्थ हा कोटो संपल्याचा अनेकांना अनुभव होता.

१ मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणामुळे मुंबई महापालिकेने ४५ पुढील वयोगटासाठी लसीकरण होणार नाही असे स्पष्ट केले होते. फक्त १८ वयोगटावरील तरूणांसाठी मुंबईतील पाच लसीकरण केंद्रांचा पर्याय देण्यात आला होता. त्यामध्ये कोविन एपवर नोंदणी केल्यानंतर मॅसेज आलेल्या नागरिकांनाच लस देण्यात येईल असे महापालिकेमार्फत स्पष्ट करण्यात आले होते. लसीचा साठा मोजकाच असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला होता. पाच लसीकरण केंद्रामध्ये मुंबईतील नायर, राजावाडी, कुपर, सेव्हन हिल्स आणि बीकेसी या पालिकेच्या रूग्णालयांचा समावेश होता. पण अनेक प्रयत्न करूनही कधी ओटीपी आला नाही, कधी लसीकरण केंद्र उपलब्ध झाले नाही, तर कधी लसीकरण केंद्रावर लसीचा कोटा संपल्याचा मॅसेजन कोविन एपवर अनेकांना आला.


 

First Published on: May 1, 2021 12:10 PM
Exit mobile version