CoronaVirus: सीएसएमटीवरील रेल्वे पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

CoronaVirus: सीएसएमटीवरील रेल्वे पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यातील हवालदारालाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या हवालदाराचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याला उपचाराकरता कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच १५ मार्चपासून ते २७ मार्चपर्यंत त्यांच्या संपर्कात आलेल्या २५ पोलिसांची देखील तपासणी केली जात आहे. या पोलीस हवालदाराला ३० मार्च रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि सतत खोकला येऊ लागला. त्यामुळे कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात केले. मात्र डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. येथे उपचार घेतल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या सोबत १५ मार्च आणि २४ मार्च ते २७ मार्च सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि लॉकअप गार्ड येथे संपर्कात आलेल्या २५ पोलीस कर्मचाऱ्यांना कस्तुरबा रुग्णालयात क्वारंटाइन करण्यात आले आहे.

मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले

मुंबईत एकाच दिवशी ५९ रुग्ण आढळले आहेत. तर, त्या पाठोपाठ १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नगरचे आणि २ बुलढाणा येथे आढळले असून सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. त्यामुळे, नक्कीच महाराष्ट्र सर्वात मोठ्या धोक्याच्या उंबरठ्यावर आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंत महाराष्ट्रात संसर्गातून रुग्ण आढळत नसल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात येत होता. पण, आता संसर्गातून पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रात ही चिंतेची बाब आहे.

First Published on: March 31, 2020 10:43 PM
Exit mobile version