उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये सापडला कोरोनाचा रुग्ण

उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये सापडला कोरोनाचा रुग्ण

उल्हासनगर कॅम्प ४ मधील संभाजी चौक येथील जिजामाता कॉलनीमध्ये राहणारा व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हा व्यक्ती मुंबई पोलीस दलाचा कर्मचारी आहे. यामुळे उल्हासनगर शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन झाली आहे. मागील आठवडात उल्हासनगर कॅम्प ५ मध्ये अत्यंत गर्दीच्या भागात एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच उल्हासनगर कॅम्प ४ मधील संभाजी चौक येथील जिजामाता कॉलनी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. जिजामाता कॉलनी जवळचा मोठ्या प्रमाणात भाग हा झोपडपट्टी किंवा गर्दीच्या चाळीचा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रोगाचा फैलाव झाल्यास नियंत्रण ठेवणे कठीण होणार आहे.

मुंबई शहरात या रोगाने फैलावत गती पकडली आहे. दर ६.६ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. ठाणे व मीरा-भाईंदरमध्ये होत असलेला फैलाव चिंतेचा विषय आहे. मुंबई व उपनगर क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे त्या क्षेत्रात राहणारे उल्हासनगर शहरातील रहिवासी किंवा उल्हासनगर येथील रहिवाशांचे नातेवाईक छुप्या पद्धतीने शहरात प्रवेश करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक वेळा आवाहन करूनही नागरिकांना नातेवाईकाकडे जाऊ नये व नातेवाईकाला बोलावू नये, असे सांगूनही त्याचे पालन केले जात नाही. ही बाब चिंतेचा विषय असून हे वेळीच न थांबविणे गरजेचे असल्याचे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.

संभाजी चौक परिसर सील

उल्हासनगर कॅम्प ४ मधील संभाजी चौक येथील जिजामाता कॉलनीमध्ये राहणारा व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची महिती पालिका प्रशासनाने सहाय्यक पोलीस आयुक्त धुला टेळे याना देताच त्यांनी तात्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे आणि पालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या बरोबर जाऊन परिसर सील केला.

भाजीपाला विक्रीची दुकाने तीन दिवस बंद

शहरातील अत्यावश्यक सेवांचे दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांना अनेक नियम घालून दिलेले आहेत. प्रशासन नियम पाळण्यासाठी दबाव आणत आहे. मात्र दुकानदार किंवा ग्राहक या दोघांनाही शिस्तीबद्दल गांभीर्य नाही. यामुळे अखेर पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी तीन दिवसांसाठी भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: April 27, 2020 10:29 PM
Exit mobile version