ठाण्यात कोरोनाचा विळखा; दोन नगरसेवकांना लागण

ठाण्यात कोरोनाचा विळखा; दोन नगरसेवकांना लागण

ठाण्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. मंत्री आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांना कोरोनाची लागण झालेली असतानाच बुधवारी आणखी दोन नगरसवेकही कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती दिवसागणिक वाढत चालल्याची दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी एका महिला नगरसेविकेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्या नगरसेविका उपचारानंतर बरे होऊन घरी परतल्या आहेत.

ठाण्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असल्याने ठाणेकरांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. आता महापालिकेतील नगरसेवकांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी आणि कळवा येथील अशा दोन नगरसेवकांना कोरोनाची लागण झाली आहे, कळव्यातील ज्येष्ठ नगरसेवकाने फेसबूकवरून ही माहिती दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचा वसा घेतलेल्या मला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आहे. आपणा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पुण्याईने मी लवकरात लवकर आपल्या सेवेकरिता पुन्हा एकदा रुजू होईन. तोपर्यंत आपण सर्वांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून आपापल्या घरी राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नगरसेवकांनाही बेडसाठी धावाधाव

ठाण्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा रुग्णवाहिका व बेडच्या अभावी मृत्यू झाल्याचे प्रकार घडले आहेत, मात्र कोरोनाची लागण झालेल्या नगरसेवकांनाही बेडसाठी झगडावे लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या नगरसेवकांना बेड मिळण्यासाठी मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याने फोन केल्याची माहितीही समोर येत आहे. वाढत्या रूग्णांमुळे रूग्णालयात बेडही फूल्ल असून बेडसाठी सर्वसामान्य रूग्णालयाप्रमाणेच आता नगरसेवकांनाही धावाधाव करावी लागल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील कॅबिनेट मंत्री, माजी खासदार आणि शिवसेनेच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, हे तिघेही उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. कोविड योध्दे म्हणून काम करीत असतानाच हे नगरसेवक बाधित झाले आहेत.

First Published on: May 27, 2020 8:12 PM
Exit mobile version