Coronavirus : अमेरिकेकडून कोरोनाविरोधी ‘मुंबई मॉडेल’चे कौतुक

Coronavirus : अमेरिकेकडून कोरोनाविरोधी ‘मुंबई मॉडेल’चे  कौतुक

मुंबईतील कोरोनाची पहिली व दुसरी लाट यशस्वीपणे थोपविण्याची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संयुक्त अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाचे सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज्’ चे सदस्य जे. लुईस कोरीया यांनी, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचे कौतुक केले आहे. तसेच, आयुक्तांना पत्र पाठवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. जानेवारी २०२१ अखेरपर्यंत पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका आरोग्य यंत्रणेने कोरोनावर नियंत्रण मिळवले होते ; मात्र फेब्रुवारी २०२१ च्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. मात्र आयुक्त चहल यांनी न डगमगता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केले. त्यामुळे जुलै २०२१ पर्यन्त कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही काहीसे नियंत्रण मिळविण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिका व आयुक्त यांच्या कामगिरीची जागतिक आरोग्य संघटना, केंद्रीय आरोग्य विभाग, मा. सर्वोच्च न्यायालय, मा. उच्च न्यायालय, नीति आयोग आदींनी दखल घेऊन त्याचे कौतुक केले आहे.

आता याच शृंखलेत संयुक्त अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहाचे सदस्य अर्थात ‘काँग्रेस ऑफ द युनायटेड स्टेट्स’च्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हज्’ चे सदस्य जे.लुईस कोरीया यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवून महापालिकेच्या कामगिरीचे दखल घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड साथरोगाच्या कालावधी दरम्यान केलेली विविधस्तरीय कामे कौतुकास्पद असल्याचे सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच या अंतर्गत प्रामुख्याने विभागस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करुन त्याद्वारे गरजू रुग्णांना रुग्णशय्यांचे वितरण संगणकीय प्रणालीद्वारे करणे, प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार व संसर्गाच्या प्रभावानुसार रग्णालयात दाखल करुन उपचार करणे, गरजू रुग्णांना योग्यप्रमाणात प्राणवायू (ऑक्सिजन) उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य व्यवस्थापन करणे इत्यादी बाबींचा जे. लुईस कोरीया यांनी त्यांच्या पत्रात उल्लेख केला आहे.

महापालिकेने राबविलेले सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना व करण्यात आलेले उपचार यामुळे एप्रिल महिन्यात जवळजवळ ३० टक्के इतका असणारा बाधित होण्याचा दर आता ४ टक्क्यांवर आला आहे. ही बाब नमूद करत जे. लुईस कोरीया यांनी, मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविधस्तरीय बाबी या व्यवस्थापन कौशल्याचे अत्युकृष्ट उदाहरण असल्याचेही नमूद केले आहे.


 

First Published on: July 8, 2021 1:53 PM
Exit mobile version