मोठी बातमी; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती स्थिर

मोठी बातमी; गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती स्थिर

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी रात्री प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सुरुवातीला ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल आणि त्यानंतर मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आव्हाड यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. आव्हाड यांचे २० वर्षांपासूनचे मित्र आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी आपलं महानगरशी बोलताना ही माहिती दिली.

मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड हे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले होते. मंगळवारी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष संजय ओक हे आव्हाड यांच्या तब्येतीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.

मिलिंद नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर आपलं महानगरशी बोलताना त्यांनी आव्हाड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

आव्हाड यांनी १५ एप्रिललाच ट्विट करुन माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याचे सांगितले होते. तसेच चार दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्रातील भाडेकरूंसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. घरमालकांनी ३ महिन्यांचे भाडे वसूल करु नये, असा निर्णय घेऊन राज्यातील लाखो भाडेकरूंना त्यांनी दिलासा दिला होता.

First Published on: April 23, 2020 12:13 AM
Exit mobile version