Coronavirus: मुंबईत आज ५१० नवे रुग्ण, बाधितांची संख्या ९,१२३ वर

Coronavirus: मुंबईत आज ५१० नवे रुग्ण, बाधितांची संख्या ९,१२३ वर

प्रातिनिधिक छायाचित्र

मार्चपासून राज्यामध्ये थैमान घातलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे. २ मे पासून सलग १०० पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याने मुंबईसाठी दिलासादायक बाब ठरत आहे. सोमवारी मुंबईमध्ये १०४ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या रूग्णांची संख्या १९०८ झाली आहे. तसेच सोमवारी ५१० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९१२३ वर तर १८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३६१ वर पोहचला आहे.

मुंबईत सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या ५०० च्या वरच राहिल्याने मुंबईतील बाधितांच्या संख्येत वाढ कायम आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची संख्या ही शंभरी पार आहे. शनिवार ते सोमवार सलग तीन दिवस १०० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच १ मे रोजीही ९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्याचप्रमाणे १ मे पासून संशयित रुग्णाची संख्याही कमी झालेली पाहायला मिळत आहे. सोमवारी मुंबईमध्ये ४३६ संशयित रुग्ण सापडले असून संशयित रुग्णाची संख्या ११ हजार ९०० इतकी झाली आहे.

मुंबईमध्ये १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३६१ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या १८ जणांमध्ये १० जण हे दीर्घकाळ आजारी होते. तर ३ जणांचा वार्धक्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ पुरुष तर ४ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ९ जण हे ६० वर्षांवरील, ७ जण हे ४० ते ६० च्या दरम्यान तर दोघांचे वय ४० पेक्षा कमी होते, अशी माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.

तारीख बरे झालेले रुग्ण | संशयित

1 मे – 95 | 484
2 मे – 137 | 481
3 मे – 100 | 469
4 मे – 104 | 436

First Published on: May 4, 2020 10:19 PM
Exit mobile version