मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या

मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या

मुंबई महानगरपालिका

रस्त्यांवर थुंकणार्‍या तसेच अस्वच्छता करणार्‍यां विरोधात महापालिकेचे क्लिन अप मार्शल तैनात असले तरीही रस्त्यांवर पिचकारी मारणार्‍यांचे प्रमाण कमी झाले नाही. मात्र करानो विषाणूच्या भीतीने रस्त्यांवर अशाप्रकारे पिचकारी मारणार्‍यांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी संपूर्ण मुंबईत करोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणार्‍यांविरोधात १ हजार रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार क्लिन-अप मार्शलबरोबरच उपद्रव शोधक पथक आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ परिवेक्षकांना रस्त्यांवर उतरवले आहे. याच्या अंमलबाजावणीला सुरुवात होऊन दिवसभरात १७४ लोकांना पिचकारीसाठी हजार रुपयांचा प्रसाद मिळाला आहे. आजच्या दिवसात एकूण या थुंकणाऱ्याकडून १ लाख ७४ हजार दंड वसूल केला आहे. तसंच ६८ जणांना समज देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक कांदिवलीतील आर दक्षिण विभागात ३० जणांवर कारवाई केली. तर त्या खालोखाल दहिसरमधील आर उत्तर विभागात २५ जणांवर कारवाई केली.

रस्त्यावर उतरून दंडात्मक कारवाईसाठी जुंपले

करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत सतर्कता बाळगत विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहे. त्याअंतर्गत महापालिका आयुक्त आणि आपत्कालिन व्यवस्थापन विभागाचे आयुक्त असलेल्या प्रविणसिंह परदेशी यांनी परिपत्रक जारी करून जास्तीत जास्त कार्यालयांनी घरुनच काम करण्याची मुभा कर्मचार्‍यांना द्यावी असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ५० टक्के कामगार, कर्मचारी वर्ग कमी करण्याचे आयुक्तांनी विविध आस्थापना, कंपन्यांना निर्देश दिले आहे. मुंबईतील ही गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जात असतानाच दुसरीकडे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी थुंकणार्‍यांविरोधातही कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये थुंकणार्‍यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड आकारण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, मुंबई महापालिकेच्या प्रत्येक विभागांमध्ये सध्या थुंकणार्‍या आणि अस्वच्छता करणार्‍यांविरोधात धडक कारवाई करणार्‍या क्लिन अप मार्शलबरोबरच उपद्रव शोधक पथक (एन.डी) आणि विभाग कार्यालयांमधील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक (जे.ओ) यांना रस्त्यावर उतरून दंडात्मक कारवाईसाठी जुंपले आहे. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागाच्यावतीने सरासरी पाच ते सहा जणांना थुंकताना पकडून त्यांना प्रत्येकी हजार रुपयांचा दंड केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे दिवसभरात १७४ लोकांवर पहिल्याच दिवशी कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्शलला सध्या १०० ते २०० रुपयांचा दंड आकारण्याचा अधिकार आहे. परंतु त्यांनाही आता १ हजार रुपयांचा दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आला आहे. शिवाय एन.डी पथक आणि महापालिकेच्या विभागांमधील जे.ओ यांनाही अधिकार दिली असून ही कारवाई बुधवारपासून अधिक तीव्र केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – मुंबईतील कार्यालयांची आजपासून झाडाझडती, ५० टक्केच कर्मचारी हवेत!


 

First Published on: March 18, 2020 10:32 PM
Exit mobile version