करोना व्हायरस : निरीक्षणाखाली असलेल्या २१ पैकी १९ डिस्चार्ज

करोना व्हायरस : निरीक्षणाखाली असलेल्या २१ पैकी १९ डिस्चार्ज

करोना व्हायरस

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या मुंबई, पुणे, ठाणे यांसह नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यातील प्रवाशांची वैद्यकीय विचारपूस करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. सध्या राज्यात पुणे आणि मिरज येथे प्रत्येकी एक जण रुग्णालयात निरीक्षणाखाली असून आतापर्यंत १९ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास १२ हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. राज्यात बाधित भागातून आतापर्यंत १०७ प्रवासी आले आहेत. त्यापैकी २१ जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. त्यापैकी २० जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले असून उरलेल्या एक जणाचा प्रयोगशाळा निकाल उद्यापर्यंत प्राप्त होईल. २१ पैकी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे येथील नायडू रुग्णालयात १ आणि मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १ जण भरती आहे.

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणाऱ्या प्रवाशांचा पाठपुरावा १४ दिवसांसाठी करण्यात येत आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १०७ प्रवाशांपैकी ३९ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासी तपासणीचे काम वाढल्याने मुंबई विमानतळावर आरोग्य अधिका-यांच्या मदतीला कालपासून राज्य सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १० वैद्यकीय अधिकारी आणि १५ आरोग्य कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

First Published on: February 4, 2020 10:19 PM
Exit mobile version