नगरसेविका हरवल्या, एमएसईबीचे अधिकारी वारले

नगरसेविका हरवल्या, एमएसईबीचे अधिकारी वारले

नालासोपार्‍यातील हा बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे

नगरसेविका हरवल्या आहेत तसेच एमएसईबीचे अधिकारी वारले आहेत. गेल्या 40 तासांपासून अंधारात असलेला एक त्रस्त नागरीक असा बॅनर सध्या वसईत चर्चेचा विषय बनला आहे. त्यातून वसईकरांच्या संताप व्यक्त झाला आहे.

रविवारी पावसाने वसईला अक्षरशः झोडपून काढले होते. त्यामुळे वसईत रविवारी पहाटेपासून वीज गायब झाली होती. तर वसईत पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वाधिक फटका नालासोपारा शहराला बसला. नालासोपारा शहरात मंगळवारपर्यंत पाणी साचून राहिले होते. तर कित्येक भागात मंगळवारी संध्याकाळी वीज आली होती. जनजीवन विस्कळीत होऊन लाखो लोकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला होता.

प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही न झाल्याने उद्विग्न झालेल्या नालोसापार्‍यातील एका त्रस्त नागरीकाने चक्क बॅनर लावून आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली. सोपारा गावातील भंडारआळी बस स्टॉपवर लागलेला हा बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. वॉर्ड क्रमांक 59 च्या नगरसेविका हरवल्या आहेत. तसेच एमएसईबीचे अधिकारी वारले आहेत. गेल्या 40 तासांपासून अंधारात असलेला एक त्रस्त नागरीक असे बॅनरवर छापण्यात आले आहे.

बहुजन विकास आघाडीच्या नगरसेविका शबनम आरिफ शेख यांचा हा वॉर्ड आहे. मुसळधार पावसही असूनही महावितरणचे कर्मचारी जीव धोक्यात घालून दोनवेळा ट्रान्सफॉर्मर आणायला गेले होते. त्यानंतरही आपण महावितरणकडे पाठपुरावा करून सोमवारी संध्याकाळी पाच वाजता ट्रान्सफॉर्मर लावून घेतला आणि वीज पुरवठा सुरळीत झाला, असे शेख यांचे म्हणणे आहे.

First Published on: August 8, 2019 4:01 AM
Exit mobile version