अपुऱ्या पाण्यामुळे कुर्ल्यातील नगरसेवक हवालदिल

अपुऱ्या पाण्यामुळे कुर्ल्यातील नगरसेवक हवालदिल

मुंबईचा पारा आता ३१ डिग्री सेल्सियसच्यावर वाढत जात असून या वाढत्या उकाड्यामुळे पाण्याची मागणीही वाढू लागली आहे. एका बाजुला कोरोनामुळे हात धुण्यास तसेच आंघोळ करण्यास अधिक पाण्याचा अधिक वापर होत असतानाच दुसरीकडे उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढतानाही दिसत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहेत. निम्म्या कुर्ला परिसरात अशाप्रकारच्या पाण्याच्या समस्यांमुळे खुद्द नगरसेवक हवालदिल झाले आहेत.

पाणी पुरवठा त्वरित पूर्ववत करावा
पाणी पुरवठा त्वरित पूर्ववत करावा

मुंबईत सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे कंपन्या, कार्यालये, शाळा, कॉलेज तसेच मॉल्स, शॉपिंग सेंटर, हॉटेल्स आदी बंद आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर कमी होत असून महापालिकेने या पाण्यात कपात न करता दैनंदिन पाणी पुरवठा पूर्वव्रत ठेवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या ३८०० दशलक्ष लिटर्स पाण्याचा पाणी पुरवठा होत आहे. परंतु या पाण्याच वापर निवासी वापरा करताच आता अधिक प्रमाणात होत असल्याचा दावा महापालिकेच्या जलअभियंता विभागाने केला होता.

परंतु, आता भांडुप पाठोपाठ आता कुर्ला परिसरातूनही कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची तक्रारी विभाग कार्यालयात येत आहेत. कुर्ला पूर्व येथील नेहरु नगर या परिसरात मागील एक महिन्यापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार स्थानिक नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी केली आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना पत्र लिहून त्यांनी कमी दाबाने येणारा पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे. मोरजकर यांच्यासह कुर्ला पूर्व विभागातील अन्य तीन ते चार नगरसेवकांच्या प्रभागातही अशाचप्रकारे पाण्याच्या तक्रारी असल्याचेही समजते.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी वारंवार हात धुण्याचे तसेच स्वच्छता राखण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने केले जाते. त्यामुळे त्यासाठी पाण्याचा वापर अधिक होत आहे. त्यातच वाढत्या उकाड्यामुळेही पाण्याचा अधिक वापर होत असतो. मात्र, अशा परिस्थितीत पाणी कमी मिळणे हे विभागातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने चिंतेची बाब असल्याचे प्रविणा मोरजकर यांनी म्हटले आहे. लॉकडाऊनपासून पाण्याची समस्या विभागात आहे. परंतु अधिकारी पाणी का कमी येते याचे कारणच स्पष्ट करत नसल्याची तक्रारही त्यांनी मांडली. यापूर्वी भांडुपमधील भाजपच्या नगरसेविका जागृती पाटील यांनीही पाण्याबाबतची तक्रारी महापालिकेकडे केली होती.

याबाबत जलअभियंता अजय राठोर यांच्याशी संपर्क साधला असता आठ ते दहा दिवसांपूर्वी काही कामे आपण घेतली होती. तेव्हा कमी पाणी आले असेल. परंतु आता कमी पाणी येत असल्याच्या कुठल्याही तक्रारी नाहीत. तरीही आपण त्या विभागाचा आढावा घेवू, असे ते म्हणाले.

First Published on: April 27, 2020 11:22 PM
Exit mobile version