जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा भार उचलला नगरसेविकेने

जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्या जेवणाचा भार उचलला नगरसेविकेने

जे जे हॉस्पिटल

‘करोना’मुळे सर्व नागरिकांना सक्तीने घरात बसवले असले तरी अत्यावश्यक सेवेतील हात या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच उपाययोजनांसाठी राबत आहेत. परंतु या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आता अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्याचा पाढा वाचला जात असतानाच जे. जे. रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, सर्व पॅरामेडिकल स्टाफ, रुग्णालयाचे सुरक्षारक्षक तसेच सर्व कामगारांच्या दुपार आणि रात्रीच्या जेवणाची जबाबदारी नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी उचलली आहे. एका बाजुला ‘कामा’ तसेच ‘सेंट जॉर्जेस’ येथील नर्सेस, स्टाफच्या जेवणाची गैरसोय होत असतानाच जामसुतकर यांनी जे. जे. रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कामगारांच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे.

जे जे हॉस्पिटल

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता म्हणून ३०० रुपये दिला जात असला तरी जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच पुरेशी वाहने नसल्यामुळे एकाच वाहनातून गर्दीतून उभ्यानेच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जोखीम भत्ता म्हणून पैसे नको, पण जेवण आणि वाहनांची व्यवस्थाच उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका रुग्णालयातील नर्सेस, वॉर्डबॉय तथा पॅरामेडिकल स्टाफकडून होत आहे. मात्र, एकाबाजुला महापालिका रुग्णालयांमध्ये किमान सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्या तरी सरकारी रुग्णालय असलेल्या जे. जे. रुग्णालय, कामा रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय आदींमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर नर्सेस तसेच पॅरॉमेडिकल स्टाफ, कामगारांची जेवणाअभावी गैरसोय होत आहे.

पैसा असूनही जेवण उपलब्ध होत नाही. त्यामुळे करोनाशी चार हात करण्यासाठी मैदानात उतरलेल्या या स्टाफला भुकेल्या पोटी ठेवणे योग्य नाही. सरकारमधील मंत्री मोठ्मोठ्या घोषणा करत असल्या तरी त्यांचा आपल्याच रुग्णालयांमधील डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे याबाबतची चिड निर्माण होवू लागल्याने जे. जे. तील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सुरक्षारक्षक तसेच कामगारांच्या जेवणाची जबाबदारी माजी नगरसेवक मनोज जामसुतकर आणि नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी उचलली आहे. मागील दोन दिवसांपासून जे. जे. तील डॉक्टर्स, कर्मचारी तसेच कामगारांना जामसुतकर यांच्या पुढाकाराने दुपार व रात्रीचे जेवणे उपलब्ध करून दिले जात आहे.

राज्याचे मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार तसेच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख तसेच राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २१० च्या स्थानिक नगरसेविका सोनम जामसुतकर यांच्यावतीने ही जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांनी सांगितले. दोन दिवसांपासून ही सेवा सुरु असून पुढेही अशाचप्रकारे सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कामा आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयांमध्येही डॉक्टर्स, नर्सेस तसेच पॅरॉमेडिकल स्टाफच्या जेवणाची गैरसोय होत असून किमान सरकारने आमच्याकडेही लक्ष द्यावे, अशी विनंती येथील स्टाफ करताना दिसत आहे.

हेही वाचा –

आदेशानंतरही खाजगी दवाखाने, रूग्णालये बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने तात्काळ रद्द

First Published on: March 28, 2020 4:31 PM
Exit mobile version