महापालिकेचा अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या सुचनांचा समावेश

महापालिकेचा अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या सुचनांचा समावेश

मेट्रोसाठी बोरीवली-दहिसरमधील लिंकरोडवरील जलवाहिनी बाधित

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प बनवण्यापूर्वी नगसेवकांच्या सूचना विचारात घेतल्या जाव्यात,अशी मागणी नगरसेवकांकडून वारंवार होत आहे. परंतु आजवरच्या एकाही आयुक्तांनी याची दखल घेतली नसली तरी विद्यमान आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी नगरसेवकांना विचारात घेवून आगामी अर्थसंकल्प बनवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी पहिली रस्ते व आरोग्य खात्याची पहिली कार्यशाळा आयोजित करून त्यामधील सुचनांच्या आधारे अर्थसंकल्पात संबंधित खात्यांच्या विकासकामांबाबत तरतूद केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समिती आणि त्यानंतर सभागृहात सादर केल्यानंतर सर्वच पक्षांचे नगरसेवक अर्थसंकल्पीय चर्चेत भाग घेवून विविध सुचना करत असतात. परंतु नगरसेवक करत असलेल्या मौलिक सुचनांची दखल प्रशासनाकडून अर्थसंकल्प बनवताना होत नाही. त्यामुळे मागील अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये राष्ट्वादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी अर्थसंकल्पावरील चर्चा या काहीच कामांच्या असून यापेक्षा अर्थसंकल्प बनवण्यापूर्वी नोव्हेंबर,डिसेंबर महिन्यात प्रशासनाने नगरसेवकांकडून विविध खात्यांसंदर्भात सूचना मागवून त्याप्रमाणे अर्थसंकल्पात विकासकामांसाठी तरतूद करावी,अशी मागणी केली होती.

त्यामुळे अखेर नगरसेवकांच्या मागणीनुसार प्रशासनाने अर्थसंकल्प बनवण्यापूर्वी नगरसेवकांच्या सुचना विचारात घेवून त्यानुसारच विकासकामांसाठीत तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शुक्रवारी दुपारी लोअर परेल येथील वन इंडियाबुल्स सेंटर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये रस्ते व आरोग्य खात्याच्या समस्या व पुढील विकासाची वाटचाल या विषयावर विचार मंथन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेला महापौरांसह सर्व गटनेते व स्थायी समिती सदस्यांना यासठी निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यशाळेला महापालिकेचे संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच आगामी २०२०-२१च्या अर्थसंकल्पात रस्ते व आरोग्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी म्हटले आहे.

First Published on: December 13, 2019 1:24 AM
Exit mobile version