घराचे आमिष दाखवून जोडप्याची फसवणूक

घराचे आमिष दाखवून जोडप्याची फसवणूक

घराचे आमिष दाखवून एका जोडप्याची सुमारे पावणेअकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी घरमालकाला शनिवारी सांताक्रुज पोलिसांनी अटक केली. सर्फराज उस्मान सैफी असे या 39 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यात तो सध्या 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात महेंद्र बोरकर हा वॉण्टेड असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

आरती अलीम ही महिला तिचा पती बाळकृष्ण अलीमसोबत सांताक्रुज येथील गजझर बांध परिसरात राहते. ती भाड्याच्या घरात राहत असल्याने ती स्वत:चे घर विकत घेण्याच्या प्रयत्नात होती. याच दरम्यान तिला महेंद्र बोरकर याने सर्फराज सैफी याच्या मालकीचे भारत रहिवाशी संघात एक घर आहे. त्याला ते घर विकायचे असून ते घर त्यांना स्वस्तात मिळवून देतो असे आमिष महेंद्रने दाखविले होते. त्यानंतर त्याने त्यांची सर्फराजशी ओळख करुन दिली होती.

पावणे अकरा लाखांना गंडा
सर्व बोलणी पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी सर्फराजला पावणेअकरा लाख रुपये दिले होते. त्यासाठी अलीम पती-पत्नीने कुणबी सहकारी पतपेढीतून काही कर्ज घेतले होते. मात्र घरासाठी दिलेले पैसे देऊनही या दोघांनीही त्यांना घराचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता तिथे रेहबर अली अन्सारी नावाचा एक व्यक्ती राहत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तेच घर सर्फराजकडून विकत होते.

एकच घर दोघांना विकले
रेहबर अन्सारी यांना ते घर विकले असताना महेंद्र आणि सर्फराजने त्याच घरासाठी त्यांच्याकडून पावणेअकरा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात या दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी सर्फराज सैफीला पोलिसांनी अटक केली तर महेंद्रचा आता पोलीस शोध घेत आहेत.

First Published on: February 19, 2019 4:12 AM
Exit mobile version