ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याचं सिद्ध न झाल्यानं आरोपीची सुटका; कोर्टाचा निर्वाळा

ट्रेनमधून उतरताना धक्का लागल्याचं सिद्ध न झाल्यानं आरोपीची सुटका; कोर्टाचा निर्वाळा

मुंबई : ट्रेनमधून उतरताना अल्पवयीन मुलीला एका माणसाचा धक्का लागला. अन्य प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला.  पोलिसांनी त्याला अटक केली. मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपीविरोधात विशेष पाॅस्को न्यायालयात खटला चालला. पाच वर्षे हा खटला चालला. पण आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यात पोलीन अपयशी ठरले.

२०१८ मध्ये ही घटना घडली. पीडित मुलगी कुटुंबासोबत सांगली येथे राहते. २६ एप्रिल २००८ रोजी ती कुटुंबासोबत मुंबईला आली. पुणे येथून त्यांनी डेक्कन एक्सप्रेस पकडली. गाडीला गर्दी होती. त्यामुळे हे कुटुंब दरवाजात उभे होते. माटुंगा स्थानक आले तेव्हा एका इसमाने पीडित मुलीला धक्का दिला. मुलगी जोरात ओरडली. अन्य प्रवाशांनी आरोपीला चोप दिला. त्यामुळे आरोपी ट्रेनच्या शौचालयात लपला. दादर स्थानकात उतरणाऱ्यांची गर्दी झाली. आरोपी शौचालयातून बाहेर आला नाही. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोलिसांच्या मदतीने आरोपीला शौचालयाच्या बाहेर काढण्यात आले.

छत्रपती शिवाजी टर्मिनस पोलीस ठाण्यात याची तक्रार करण्यात आली. पीडित मुलीच्या वडिलांनी वरील वर्णन पोलिसांना सांगितले. त्याआधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने विशेष पाॅस्को न्यायालयात याचा खटला चालला.

विशेष न्यायाधीश पाॅस्को न्यायाधीश श्रीमती के. के. पाटील यांच्यासमोर यावर सुनावणी झाली. अल्पवयीन मुलीला आरोपीने जाणीवपूर्वक धक्का मारुन तिचा विनयभंग केला. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा ठोठावावी, अशी मागणी सरकारी पक्षाने केली.

मात्र पीडित मुलीला आरोपीनेच धक्का मारला हे सांगणारा एकही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. तसेच पीडित मुलीनेही आरोपीनेच धक्का मारला हे ठामपणे सांगितले नाही. केवळ धक्का लागला एवढचं सांगितलं आहे. त्यामुळे आरोपीचा गुन्हा सिद्ध होत नाही. आरोपीला जाणीवपूर्वक या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा युक्तीवाद आरोपीचे वकील अॅड. प्रकाश साळशिंगीकर यांनी केला. तो ग्राह्य धरत विशेष न्यायाधीश पाॅस्को न्यायाधीश श्रीमती के. के. पाटील यांनी आरोपीची निर्दोष सुटका केली.

First Published on: December 2, 2022 9:43 PM
Exit mobile version