Coronavirus: ठाणे मनपातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाची प्रकृती अत्यवस्थ

Coronavirus: ठाणे मनपातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाची प्रकृती अत्यवस्थ

ठाण्यतील रस्ते सफाईच्या ऑनलाईन निविदांनाच वारंवार मुदतवाढ का?; कॉंग्रेसचा सवाल

ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आज रात्री त्यांची तब्येत खालावल्याची माहिती मिळत आहे. २७ मे रोजी फिल्डवर काम करत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाले असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अचानक त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे ठाणे मनपातील भाजपचे नगरसेवकालाही कोरोनाची लागण झाली होती, मात्र त्यांची प्रकृती बरी असून ते घरी परतले आहेत.

ठाण्यातील राजकीय वर्तुळात या दोन नगरसेवकांच्या बातमीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. याआधी ठाण्यातील एका कॅबिनेट मंत्र्यालाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे ठाणे महापालिकेत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या दोन्ही नगरसेवकांना उपचारासाठी बेड मिळवायला सामान्य माणसाप्रमाणेच ताटकळत बसावे लागले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात जागा मिळाली. दोघांनीही आपापल्या सोशल मीडियावर पोस्ट टाकून कोरोनाच्या काळात आम्ही फिल्डवर उतरून मदत करत असताना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांनी मदतकार्य थांबवले देखील होते. प्रकृती स्थिर झाल्यावर पुन्हा एकदा फिल्डवर उतरून काम करु, असेही दोन्ही नगरसेवकांनी सांगितले होते.

आज सकाळीच मीरा-भाईंदर महापालिकेतील एका शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली होती. मुंबई महानगरपालिकेच्याही काही नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. मात्र उपचारानंतर त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. नगरसेवकांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची बाब चिंताजनक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

First Published on: June 9, 2020 11:58 PM
Exit mobile version