कोरोनाचे नियम पायदळी; लग्न सोहळ्यावर कारवाई, एफआयआर दाखल

कोरोनाचे नियम पायदळी; लग्न सोहळ्यावर कारवाई, एफआयआर दाखल

लग्न सोहळ्यावर कारवाई, एफआयआर दाखल

मुंबईतील बाबुलनाथ मंदिराजवळील ‘संस्कृती हॉल’मध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करून सुरु असलेल्या लग्न सोहळ्यावर महापालिकेच्या पथकाने अचानक धाड टाकून कारवाई केली. यावेळी हॉल मालकाला ५० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. तसेच हॉल मालक आणि लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बाबुलनाथ मंदिराजवळील दादीसेठ मार्गालगत असणाऱ्या ‘संस्कृती हॉल’मध्ये ‘ब्रेक द चेन’च्या नियमावलीतील नियमांचे उल्लंघन करून विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती पालिकेच्या विभाग कार्यालयाला मिळाली होती.

त्यानुसार विभाग कार्यालयाच्या पथकाने सदर ठिकाणी अचानक धाड टाकली. त्यावेळी तिथे विवाह कार्यक्रम व जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. १५० व्यक्ती विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचे आढळून आले. तसेच सदर ठिकाणी उपस्थित व्यक्तींनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचेही पालन न केल्याचे निदर्शनास आल्याचे पालिकेने म्हटले आहे.

कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन झाल्याने सदर हॉलचे मालक आणि विवाह सोहळ्याच्या आयोजकांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित हॉल चालकावर नियमाने ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई करण्यात आली. तसेच हाॅल चालक व संबंधित लग्न सोहळ्याचे आयोजक यांच्याविरोधात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

First Published on: April 30, 2021 8:28 PM
Exit mobile version