मुंबईकरांसाठी दिलासादायक! मुंबईत आज शुन्य कोविड मृत्यू

मुंबईकरांसाठी दिलासादायक! मुंबईत आज शुन्य कोविड मृत्यू

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून सुरू झालेल्या कोविड संसर्ग लढ्यात कोविड मृत्यूदर दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी फार मोठी आनंदाची बाब नसली तरी काहीशी समाधानकारक बाब जरूर आहे. यापूर्वी, १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी कोविड संसर्ग लढ्यात कोविड पहिल्यांदा शून्य मृत्युदरावर बाद झाल्याची नोंद पालिका दरबारी आहे. त्यानंतर दीड महिन्यांनी म्हणजे ११ डिसेंबर रोजी कोविड संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली नाही.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोविड संसर्ग धुमाकूळ घालत आहे. गेल्या पावणे दोन वर्षात कोविड संसर्गाची पहिली व दुसरी लाट पालिका आरोग्य यंत्रणेने अनेक अडचणींचा मुकाबला करीत यशस्वीरित्या परतावून लावली आहे. कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र पालिका आरोग्य यंत्रणेने त्या तिसऱ्या लाटेलाही मुंबईच्या वेशीवर रोखण्याचा प्रयत्न केला.

सध्या कोविड विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ‘ओमायक्रॉन’ ह्या विषाणूने दक्षिण आफ्रिका व युरोपियन देशात धुमाकूळ घातला असून त्याने भारतात व काही अंशी मुंबईत चंचूप्रवेश केला आहे. मात्र पालिका आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा कंबर कसून चीनच्या अभेद्य भिंतीसारखी उभी ठाकली आहे.

कोविडची दुसरी लाट नियंत्रणात आल्यापासून मागील काही कालावधीत कोविड संसर्गाने मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज १ ते ६ एवढीच स्थिर होती. गेल्या १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी कोविड संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नव्हता. म्हणजेच कोविड संसर्गाने मृत पावणाऱ्या रुग्णांची संख्या ‘शून्य’ एवढी होती. त्यावेळी पालिका आरोग्य यंत्रणा व मुंबईकरांच्या दृष्टीने ती बाब काहीशी समाधानकारक होती. आता त्यानंतर म्हणजे चक्क दिड महिन्यांनी पुन्हा एकदा कोविड बाधित एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

आतापर्यंत कोविड संसर्ग बाधित ७ लाख ६५ हजार ११० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ४४ हजार ३७० रुग्ण यशस्वी उपचाराने कोविड मुक्त झाले. मात्र उपचार सुरू असताना नियतीने डाव साधल्याने आतापर्यंत १६ हजार ३५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर विविध रुग्णलयात कोविड संसर्गाने बाधित १ हजार ८०८ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.

 

First Published on: December 11, 2021 11:04 PM
Exit mobile version