गुन्हे शाखेची धडक कारवाई; फसवणुक करणारे ८ जण अटकेत

गुन्हे शाखेची धडक कारवाई; फसवणुक करणारे ८ जण अटकेत

कुर्ल्यात लैगिंक अत्याचारानंतर २० वर्षीय तरुणीची हत्या, प्रियकरासह मित्राला अटक

वेबसाईट आणि अ‍ॅपद्वारे लॉटरी व्यवसाय करुन राज्य शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी आठजणांच्या एका टोळीला कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. राजेश अमर किराड, रोहित अशोक माटे, गोपाल जगदेव सिंग, इम्रान शमशुद्दीन शेख, संजय हनुमंत गिरी, मनोज मंगल पंडित, विशाल संतोष दुबे आणि अनिल दत्ताराम वारंग अशी या आठजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई शहरात काही लॉटरी चालक वेबसाईट आणि अ‍ॅपद्वारे लॉटरी व्यवसाय करुन अनेकांची फसवणुक करीत आहेत, त्यामुळे राज्य शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याची गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी अशा लॉटरी सेंटरची माहिती काढण्यास सुरुवात केली होती, या माहितीनंतर या पथकाने सांताक्रुज, खार आणि वांद्रे येथील पाच लॉटरी सेंटरमध्ये छापा टाकला होता. यावेळी तिथे असलेल्या आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीचे आठ मोबाईल फोन, ५१ हजार ७८० रुपयांची कॅश, पाच हार्डडिस्क, पाच मॉनिटर, पाच सीपीयु, पाच माऊस, पाच किबोर्ड, पाच बारकोड स्कॅनर, तीन वायफाय राऊटर, स्पाईक गार्ड, वायर, प्रिंटरचे कागदी रोल, ऑनलाईन लॉटरीची ग्राहकांना दिलेली प्रिंटेड चिठ्ठ्या आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

तपासात या आरोपींनी विविध वेबसाईट बनवून त्याद्वारे सुपर सहा, सुपर नऊ, स्टार ९९ नावाचे अ‍ॅप बनवून बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरी चालवित असल्याचे सांगितले. याच गुन्ह्यांत ते सर्वजण पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

First Published on: January 21, 2021 8:38 PM
Exit mobile version