कधी बोलणार आपण? RPF जवानाने केला महिलेचा विनयभंग

कधी बोलणार आपण? RPF जवानाने केला महिलेचा विनयभंग

सीआरपीएफ जवानाकडून महिलेचा विनयभंग

महिलांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या आरपीएफ जवानानेच एका महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही महिला जिथे बसली होती. त्यासमोर बसलेल्या तरुणाने हा व्हिडिओ शूट केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. राजेश जहांगीर असे या जवानाचे नाव असून जवानावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्या आरपीएफ जवानांवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्याच जवानाने हा गंभीर प्रकार केल्यामुळे आता सुरक्षा व्यवस्थेवरच अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमकं काय घडलं?

१८ जून (सोमवारी) एक महिला कल्याण स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. तिने तिच्यासोबत असलेल्या लहान मुलाला झोपवले होते. तिच्या मागे हा आरपीएफचा जवान बसला होता. हा जवान जाणून बुजून महिलेच्या पाठीवरुन हात फिरवत आहे, हे लक्षात आल्यावर त्याने हा व्हिडिओ केला. काही वेळाने ही गोष्ट महिलेच्या लक्षात आली. झोपेत असल्याचे दाखवत आरपीएफचा हा जवान तिच्या अंगावरुन हात फिरवत होता. या महिलेने यासंदर्भात तिच्यासोबत असलेल्या महिलेला सांगितल्यानंतर जमावाने त्याला बेदम चोपला.

राजेश जहांगीरची नोकरी गेली

महिलेला छेडल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मध्य रेल्वेने त्वरीत कारवाई केली आहे. राजेश जहांगीर असे या जवानाचे नाव असून तो हेडकॉन्स्टेबल असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय त्याच्या अशा वागण्यामुळे त्याला त्याच्या नोकरीला मुकावे लागले आहे.

महिलेने बोलायला हवं ना!

कल्याण स्टेशवर ही घटना घडत होती तेव्हा व्हिडिओ काढणाऱ्या मुलाचा राग अनावर झाला होता. ज्या महिलेसोबत हे घडत होते, तिने काही तरी बोलावे यासाठी तो सारखा बोलत होता. अखेर त्या महिलेला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला.

महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच

रेल्वेतून दररोज कित्येक महिला प्रवास करतात. रात्री प्रवास करताना महिलांना सुरक्षित वाटावे, यासाठी आरपीएफचे जवान प्रत्येक स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत. पण अशा प्रकारे जबाबदार व्यक्तीकडूनच असे प्रकार होत असतील तर महिला अजूनही सुरक्षित नसल्याचेच चित्र दिसत आहे.

First Published on: June 20, 2018 3:22 PM
Exit mobile version