सीरियल बलात्कारी रेहानचे क्रौर्य

सीरियल बलात्कारी रेहानचे क्रौर्य
चार जिल्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणारा नराधम रेहान अन्सारी यानेच २०१० साली कुर्ल्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. सीरियल बलात्कारी रेहान याला अटक केल्यानंतर त्याने त्या दोन बलात्कारांची कबुली दिली. बलात्कार झालेल्या मुलींचे घेतलेले डीएनए रेहानच्या डीएनएशी जुळले. त्यामुळे या नराधमाचा काळा चेहरा उजेडात आला आहे.
रेहान अन्सारी (२७) या सीरियल बलात्कार्‍याची बातमी त्याच्या फोटोसकट सप्टेंबर महिन्यात ‘दै. आपलं महानगर’ ने सर्वप्रथम छापली होती. या बलात्कार्‍याने  अंधेरी, नवी मुंबई, नालासोपारा, पालघरमध्ये सुमारे १५ अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे प्रसिद्ध झाल्यानंतर पोलीस आणि जनता सतर्क झाली. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी नालासोपारा येथून सप्टेंबरमध्ये रेहान अन्सारीला अटक केली. त्याचा ताबा नंतर मुंबई पोलिसांनी घेतला. त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने नेहरूनगर, कुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मुलींच्या हत्येची कबुली दिली आहे.
कुर्ला(पूर्व) नेहरू नगरमध्ये २०१० साली फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत ६ ते ९ वर्षे वयोगटातील तीन मुलींवर बलात्कार झाला होता.या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यातील एक मुलगी सानियाचा मृतदेह फेब्रुवारी महिन्यात वत्सलाताई नाईक नगर या ठिकाणी असलेल्या एका एसआरए इमारतीच्या टेरेसवर आढळून आला. त्यानंतर दुसरी अल्पवयीन मुलगी अंजलीचा मृतदेह नेहरू नगर पोलीस ठण्याच्या शेजारी असलेल्या पोलीस इमारतीच्या टेरेसवर रक्तरंजित अवस्थेत आढळून आला. या घटनेने संपूर्ण पोलीस दल हादरले.कारण त्याच इमारतीत तिसर्‍या मजल्यावर नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे आपल्या कुटुंबासोबत राहत होते.
पोलिसांनी या बलात्कार्‍याला पकडण्यासाठी जंगजंग पछाडले, पण तो सापडला नाही. त्यातच अजून एक अल्पवयीन मुलगी नुसरतचा मृतदेह वत्सलाताई नाईक नगर झोपडपट्टीतील एका बंद घराच्या पोटमाळ्यावर आढळला. याप्रकरणी जावेद शेख या गुन्हेगाराला अटक केली होती. तो सानिया-अंजली या दोन मुलींचाही मारेकरी असल्याचे मानले जात होते. मात्र जावेदचे डीएनए त्या दोन मुलींशी जुळले नाहीत. त्यामुळे त्या दोन अल्पवयीन मुलींना न्याय मिळाला नव्हता. सानिया- अंजलीच्या हत्येनंतर नेहरूनगर पोलिसांनी सुमारे 6 हजार जणांची डीएनए चाचणी केली होती, त्यात पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील पुरुषांच्या डीएनए चाचणीचा समावेश होता.
रेहान अन्सारीला अटक झाल्यानंतर त्याचा डीएनए या दोन मुलींशी जुळला. त्यामुळे रेहानच अंजली आणि सानिया या दोन अल्पवयीन मुलींचा खुनी असल्याचे उघड झाले. तब्बल आठ वर्षांनी मुंबई पोलिसांना अन्सारी मिळाला आहे. अन्सारीची चौकशी सुरू असून त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.
First Published on: October 16, 2018 2:42 AM
Exit mobile version