रश्मी शुक्ला हाजीर हो! चौकशीसाठी सायबर सेलचे दुसर्‍यांदा समन्स

रश्मी शुक्ला हाजीर हो! चौकशीसाठी सायबर सेलचे दुसर्‍यांदा समन्स

केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) अप्पर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दुसर्‍यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स मुंबई सायबर सेल पोलिसांनी बजाविले आहे. 3 मे रोजी चौकशीसाठी हजर राहावे असे समन्समध्ये नमूद केले आहे. यापूर्वी रश्मी शुक्ला यांची 28 एप्रिलला चौकशी होणार होती. मात्र, कोरोनाचे कारण देत त्यांनी चौकशीसाठी हजर राहणे टाळले होते.

त्यामुळे त्यांना आता दुसरे समन्स पाठविण्यात आले आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी फोनटॅपिंग प्रकरणात सीबीबआयने त्यांचा जबाब हैदराबादमध्ये नोंदवल्याचे समजते. रश्मी शुक्ला या एसआयटीच्या प्रमुखपदी असताना त्यांनी काही व्यक्तींचे फोन टॅप केले होते, या व्यक्तींकडून सार्वजनिक सुरक्षा व्यवस्थेला धोका असल्याचे सांगून त्यांची परवानगी न घेता आयपीएस अधिकार्‍यांमध्ये होणार्‍या बदल्यांचे टॅपिंग केले होते, हा अहवाल नंतर राज्य सरकारला सादर केला होता.

मात्र, हा अहवाल राज्य शासनाने फेटाळून लावला. परवानगी न घेता काही आयपीएस अधिकार्‍यांचे फोन टॅप केल्यानंतर त्यांना चांगलीच समज दिली होती. मात्र, त्यांनी माफी मागून ते प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला होता. हा गोपनीय अहवाल विरोधकांकडे कसा आला याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सायबर सेलने अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे चौकशीसाठी त्यांना समन्स पाठविले आहेत.

First Published on: April 30, 2021 4:30 AM
Exit mobile version