सिलेंडर स्फोटातील मयत महिलेचा परिवार आजही मदतीपासून वंचित

सिलेंडर स्फोटातील मयत महिलेचा परिवार आजही मदतीपासून वंचित

घटना घडलेली बिल्डिंग

सिलेंडर स्फोटात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मदतीसाठी अनेकांचे हात पुढे आले. मदतीचीअनेक आश्वासने मिळाली. राजकीय वर्दळ अनेक दिवस घरात होती,ती कालांतराने ओसरत गेल्याने मदतीचे हातही दूर झाले.आज मदत मिळेल,उद्या मदत मिळेल या आशेवर जगत पाच वर्षे झाली तरी ती मदत आजही अपूर्णच असल्याचे मयत संगीता सुरेश देवकर यांचे पती सुरेश देवकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलतांना सांगितले.

नेरूळमधील सेक्टर १६ पंचरत्न सोसायटीत ३ फेब्रुवारी २०१४ रोजी रात्री ९ च्या सुमारास दुसर्‍या मजल्यावर राहणार्‍या रवींद्र तोडवलकर यांच्या घरात सिलेंडर स्पोट झाला.त्या वेळी तोडवलकर यांच्या घरात कोणीही नसल्याने त्यांच्या घरात जीवित हानी झाली नाही.सिलेंडर स्फोटात त्याच सोसायटीत तिसर्‍या मजल्यावर राहणार्‍या संगीता देवकर यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ माजली. देवकर या त्या वेळी इमारतीच्या खाली उतरत होत्या.अचानक स्पोट झाल्याने त्यांच्या अंगावर भिंतींचा काही भाग पडला तर त्याच वेळी त्यांना शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.सिलेंडर स्पोट शक्तिशाली असल्याने संपूर्ण इमारतीला धक्का बसला. इमारतीमधील चार घरे त्यात नष्ट झाली. स्पोटचा आवाज इतर परिसरातही आल्याने विभागात एकच खळबळ माजली. घटना गंभीर असल्याने अनेक राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी हजेरी लावली, तर घटनेत मृत झालेल्यांना आणि नुकसान झालेल्यांना मदत मिळेल असेही सांगण्यात आले. त्यावेळी शहरात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने या ठिकाणी माजी मंत्री गणेश नाईकसह अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. गणेश नाईक यांनी ज्यावेळी देवकर कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा त्यांना तुमच्या मुलाला काम मिळवून देऊ,व १ लाख रुपयांचा चेकही देऊ असे सांगितले.

त्यानंतर महानगरपालिका,गैस एजन्सी सह इतर सामाजिक संस्थानीही मदत करण्याचे जाहीर केले. त्यावेळी मदतीचा ओघ बघून देवकर यांचे मन भारावून गेले.जसे जसे दिवस गेले तसे तसे मदतीचे हात लांब होत गेले.घटनेनंतर काही कार्यक्रमानिमित्त गणेश नाईक आगरी कोळी भवन मध्ये आले असता त्यावेळी देवकर यांनी पुन्हा त्यांची भेट घेतली.व जाहीर केलेल्या मदती संबंधी विचारले.त्यावेळी त्यांनी रोख रक्कम देऊ की,चेक देऊ असे सांगत नगरसेवक सुरज पाटील यांची भेट घेण्यास सांगितले.त्यानंतर देवकर यांनी सुरज पाटील यांची भेट घेतली असता नाईक साहेब आणि माझ्यात असे काही बोलणे झालेच नाही, असे त्यांना सांगण्यात आल्याने देवकर यांना धक्काच बसला. मनपाने ८ दिवसात मदत करतो असे जाहीर केले. मात्र त्यांनीही तब्बल १ वर्षांनी १,२०,०००/- रुपयांचा चेक दिला. गॅस एजन्सीच्या चुकीमुळे सदर प्रकार घडला असता त्यांनीही ४,९८,०००/- रुपयांची तुटपुंजी मदत करत आम्हाला वाळीतच टाकल्याने यापुढचा एकट्याने संसाराचा गाढा हाकणे कठीण झाले आहे.अपघातानंतर अनेक शारीरिक व्याधी निर्माण झाल्याने उत्पनाचा मार्गही खुंटला आहे.राजकीय नेत्यांनी झालेल्या घटनेत आपली पोळी भाजून घेतली असून आम्हाला न्याय मिळणार कि नाही याकडे आजही आमचे लक्ष लागले आहे.

 ज्यांच्या घरात सिलेंडर स्फोट झाला त्यांच्या घरात कोणीच जखमी अथवा मृत नाही,तरी त्यांना ४० लाख रुपये पर्यत विविध ठिकाणाहून मदत मिळाली.त्याच घटनेत आमच्या घरातील व्यक्ती जाऊनही आम्हाला तुटपुंजी मदत मिळत आहे तर भाडोत्री म्हणून अपमानास्पद वागणूक मिळत आहे.घटनेत अनेक शारीरिक व्याधी झाल्याने काम करण्यात खूप अडचण निर्माण होत आहे. अशात मदत म्हणून महापालिका,सिडको व मंत्रालय दफ्तरी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

-सुरेश देवकर (घटनेतील पिडीत)

ज्यावेळी घटना घडली त्यावेळी अनेक राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी हजेरी लावली आणि मिडीयाच्या माध्यमातून फक्त आपली प्रसिद्धी करून घेतली.देवकर हे न्याय मिळेल म्हणून वाट बघत असताना निव्वळ त्यांच्या सय्यमतेचा फायदा इतरांनी घेतला.ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत न होता नको त्यांना भरभरून मदत करण्यात आली.आजमितीला त्यांना मदतीची गरज असतांना कोणीही त्यांच्या पाठीशी नसल्याने त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मी मंत्रालय दरबारी पाठपुरावा करणार आहे.

सुवर्णा हाडोळे (समाजसेविका,नेरूळ)

ज्या इमारती मध्ये घटना घडली त्या ठिकाणी मी स्वत: राहतो, नगरसेवक असताना देवकर यांच्या कुटुबियांना मदत मिळावी यासाठी आम्हीही प्रयत्न केले. मात्र सत्ताधारी पक्षाने यात राजकारण करत एकाला न्याय तर दुसर्‍यावर अन्याय अशी भूमिका घेतल्याने आमचा नाईलाज झाला.

सतीश रामाने (माजी नगरसेवक)

First Published on: August 23, 2018 12:40 PM
Exit mobile version