दादरचे नामकरण नकोच!

दादरचे नामकरण नकोच!

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर

मध्य रेल्वेवरील दादर स्टेशनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मीने केली आहे. त्यासाठी या संघटनेने दादर रेल्वे स्थानकात पोस्टरही लावले. असे असताना भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र दादर रेेल्वे स्थानकाच्या नामांतरास विरोध दर्शवला आहे. दादर या भागाला ऐतिहासिक महत्त्व असून त्या ठिकाणाचे नावे बदलू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी गेल्या २० ते २५ वर्षांपासून मागणी होत आहे. यंदा भीम आर्मी यासाठी आक्रमक झाली आहे. ६ डिसेंबरपूर्वी दादर स्थानकाचे नामांतर करावे, अशी मागणी करणारे निवेदन भीम आर्मीने रेल्वे प्रशासनाला दिले होते. गुरुवारी सकाळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानक परिसरात ठिकठिकाणी पत्रके लावून स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. या घडामोडींच्या पाश्वर्र्भूमीवर प्रकाश आंबेडकर यावर त्यांची भूमिका मांडतांना म्हणाले, मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सात बेटांचे हे शहर असून दादर, माहीम, कुलाबा अशा ठिकाणांचे नाव बदलू नये. नव्या पिढीसमोर या जागांचे ऐतिहासिक महत्त्व आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली आहे. गुरुवारी सकाळी प्रकाश आंबेडकर यांनीही चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

राज माझी कॉपी करतात
राम मंदिराच्या मुद्यावरून देशात दंगली घडतील, हे आपण महिनाभरापूर्वीच म्हटले होते. राज ठाकरे यांना डोके नाही. ते माझीच कॉपी करत आहेत, अशी टिका त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध केली.

मराठा आरक्षणावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी भाजपाने आरक्षण दिले. मराठा समाजाची मते मिळाल्यास भाजपाच्या जागा १७० पर्यंत जातील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. पण मी त्यांच्या आनंदात खडा टाकू इच्छित नाही, असा टोला त्यांनी लगावला. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसी समाजात भीती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला.

ओवेसींचा पलटवार
राज ठाकरेंच्या आरोपांवर असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, राज ठाकरेंचा आलेख आता घसरत आहे. ओवेसी ही एखादी टॅबलेट असावी किंवा माझं नाव घेऊन त्यांच्या अंगात बळ येत असावे. राजकारणात स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला जात आहे, असे त्यांनी सांगितले होते.

First Published on: December 7, 2018 5:49 AM
Exit mobile version