मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा होणार बंद!

मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा होणार बंद!

मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा बंद, स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम

मुंबईकरांनो दुधाचा साठा आत्ताच करून ठेवा! कारण मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा बंद करण्यात येणार असून चेक नाक्यावर दूध रोखण्यात येणार आहे. लिटरमागे ५ रूपयांची दरवाढ देण्याची मागणी फेटाळून लावल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. लिटरमागे ५ रूपयांची दरवाढ देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली होती. मात्र लिटरमागे ३ रूपये दरवाढ देण्यावर दूध महासंघाच्या प्रतिनिधींनी तयारी दाखवली. परिणामी आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आंदोलनावर ठाम असल्याचे सांगत मध्यरात्रीपासून आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे मुंबईच्या चेक नाक्यावर शहरात येणारे दूध रोखण्यात येणार आहे. परिणामी, मध्यरात्रीपासून मुंबईमध्ये दुधाचा तुटवडा जाणवू शकतो. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्राईड हॉटेलमध्ये खासगी आणि सहकारी दूध संघाच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना लिटरमागे ३ रूपये दर वाढवून देण्याचा निर्णय झाला. सरकारने दूध भुकटीला अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यामुळे टप्प्याटप्प्याने दूध दरवाढ करता येईल अशी भूमिका दूध संघांनी घेतली आहे. तसेच जीएसटीमध्ये सुट दिल्यानंतर पुढील दरवाढीची घोषणा करू असे देखील खासगी आणि सहकारी दूध संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले.

३ रूपयांची दरवाढ अमान्य

दुधाच्या दरामध्ये ३ रूपयांची दरवाढ केली. मात्र याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रविवारी ( आज ) मध्यरात्रीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. दरम्यान, आंदोलनाच्या भूमिकेमध्ये कोणताही बदल होणार नाही असे देखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा

दूध दरवाढीच्या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. मध्यरात्रीपासून मुंबईच्या चेक नाक्यावर दूध रोखले जाईल. त्यामुळे मध्यरात्रीपासून मुंबईचे दूध बंद होईल. या आंदोलनाला बुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, शिक्षक आमदार कपिल पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, विरारचे महापौर रमेश जाधव, मुंबई ऑटोरिक्षा व कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी देखील पाठिंबा दिला आहे. तसेच रविवारी मध्यरात्री गुजरातमधून येणारा दूध पुरवठा अडवण्यासाठी विरार येथे देखील बैठक झाली. यावेळी शेतकरी कृती समिती, किसान सभा, गोकुळचे प्रतिनिधी यांनी देखील आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

First Published on: July 15, 2018 1:56 PM
Exit mobile version