डान्स मास्टर

डान्स मास्टर

कोरिओग्राफर सरोज खान

हिंदी चित्रपटसृष्टी सुरूवातीपासूनच नायक प्रधान असल्याचे आपण पाहिलंय. इथे नायिकेला फक्त हिरोचा आधार किंवा झाडांभोवती फिरून गाण्यांवर नृत्य करण्याइतपत तिचा वावर असायचा. ठराविक एका काळापर्यंत हेच पाहायला मिळत होतं, परंतु हिंदी सिनेमांमधील नायिकेची ओळख फक्त गाण्यांमुळेच नव्हे तर त्यावरील नृत्यशैलीमुळे बनवण्याची कला अवगत होती ती प्रसिद्ध आणि ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना. नायिका त्यांच्या सुपरहिट गाण्यांमुळे, डान्स स्टेप्समुळे ओळखल्या जावू लागल्या याचे श्रेय सरोज खान यांना दिले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. डान्स मास्टर सरोज खान यांनी फक्त नायिकांनाच नव्हे तर नायकांनाही आपल्या तालावर नाचवले. सरोज खान यांनी शुक्रवारी वयाच्या 71 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. आज त्या जगात नसल्या तरी त्यांचे सारे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले दिसत

सरोज यांनी संकटकाळी कधी हार मानली नाही. त्यांनी कायम संकटांशी दोन हात केले आणि आपल्या तालांवर त्यांना नाचवले. काळजी, भय, दुःख आपल्या काळजात ठेवून एक दोन तीन… या गाण्यांवर त्या आधी थिरकल्या आणि मग माधुरी दीक्षित त्यांचा चेहरा बनली. या गाण्याने लोक आपलं दुःख विसरली. आपले दुःख काळजात घेऊन त्या कलाकार आणि प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर आनंदसरींची बरसात करत राहिल्या.

एखाद्या चित्रपटातील अभिनेत्रीची कथा वाटावी अशी वळणे सरोज खान यांच्या आयुष्यात आली. 1947 ला झालेल्या भारत-पाकिस्तान फाळणीनंतर सरोज खान यांचे कुटुंबीय भारतात आले. 22 नोव्हेंबर 1948 साली मुंबईत सरोज खान यांचा जन्म झाला. कृष्णचंद साधू सिंह आणि नोनी सिंह यांची कन्या निर्मला नागपाल हे त्याचे मूळ नाव. वयाच्या तिसर्‍या वर्षातच त्यांनी बाल कलाकार म्हणून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘नजराणा’ या हिंदी चित्रपटात त्यांनी श्यामा ही भूमिका साकारली. पुढे वयाच्या 10 व्या वर्षापासून त्या बॅकग्राऊंड डान्सर म्हणून चित्रपटातील गाण्यांमध्ये दिसू लागल्या.

निगाहे मिलाने को जी चाहता है…. आईए मेहेरबा… या गाण्यांमध्ये ग्रुप डान्सर्सपैकी एक सरोजदेखील होत्या. नृत्य विशारद बी. सोहनलाल यांच्याकडे सरोज खान नृत्याचे प्रशिक्षण घेत होत्या. बी. सोहनलाल यांनाही त्यांनी प्रभावित केले. वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सरोज खान यांनी 43 वर्षीय सोहनलाल यांच्याशी विवाह केला होता. मात्र ते विवाहित असल्याचे त्यांना माहिती नव्हते. पुढे 1975 साली त्यांनी उद्योगपती सरदार रोशन खान यांच्याशी लग्न केले.

अखेर 1974 साली आलेल्या ‘गीता मेरा नाम’ चित्रपटातून सरोज यांनी नृत्य दिग्दर्शनात पदार्पण केले. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती मि. इंडिया चित्रपटातील श्रीदेवी यांच्या हवा हवाई… या गाण्यामुळे. मग मात्र सरोज यांनी मागे वळून पाहिले नाही. त्या आधी त्यांनी हिरो आणि नगिना चित्रपटातील गाण्यांचेही नृत्य दिग्दर्शन केले होते. सरोज खान यांची खरी गट्टी जमली ती अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्यासोबत. माधुरीचा डान्स आणि सरोजजींच्या डान्स स्टेप्स हे जणू समीकरणच बनले होते. ‘तेजाब’मधील एक दोन तीन…. या गाण्यापासून सुरू झालेला सुपरहिट नृत्याचा फॉर्म्युला पुढे, ‘बेटा’मधील धक धक करने लगा, ‘खलनायक’मधील चोली के पिछे क्या है, ‘सैबाल’मधील हमको आज कल है, ‘अंजाम’मधील चने के खेत मे, बाजूबंद बाजूबंद, ‘देवदास’मधील डोला रे डोला, ‘कलंक’मधील तबाह हो गए यासारख्या गाण्यांमध्ये प्रेक्षकांनी दोघींच्या नृत्यकलेची जादू अनुभवली. एक दो तीन… या गाण्याने माधुरी दीक्षितला रातोरात स्टार बनवले. सरोज खान यांनी करिना कपूर, ऐश्वर्या राय, आलिया भट या नायिकांसह शाहरुख खान, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, ऋषी कपूर, अनिल कपूर यांच्यासह अनेक नायकांनाही आपल्या तालावर नाचवले आहे.

हिंदी सिनेमांमध्ये पाच दशकांहून अधिक काळ आपल्या नृत्यशैलीने प्रेक्षकांवर भुरळ पाडणार्‍या सरोज खान यांना ‘मास्टरजी’ म्हणून संबोधले जात असे. 2019 साली आलेला ‘कलंक’ हा त्यांचा नृत्य दिग्दर्शन केलेला अखेरचा चित्रपट ठरला. योगायोग म्हणजे या चित्रपटात त्यांची लाडकी अभिनेत्री माधुरी दीक्षित होती. अंगविक्षेपी नृत्यापेक्षा चेहर्‍यावरील हावभावाला अधिक प्राधान्य देणार्‍या, गाण्याचे बोल समजून त्यानुसार नृत्य बसवणार्‍या सरोज खान यांचे क्लासिकल नृत्य शैलीवर प्रभुत्व होते. ‘तुम्हाला नाचता येत नसेल तर चेहर्‍यावरील भाव जास्त प्रकर्षाने उमटू द्या’, असा सल्ला त्या अभिनेत्रींना देत असत. सरोज खान जरी आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी सुपरहिट गाण्यांवरील कधीही न विसरता येणार्‍या त्यांच्या डान्स स्टेप्स कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील, यात शंका नाही.

First Published on: July 4, 2020 6:59 AM
Exit mobile version