येऊर मधील वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका!

येऊर मधील वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका!

ठाणे परिसराला लाभलेला निसर्गरम्य वातावरणाचा येऊर हे हजारो नागरिकांचे शांतीवन आहे. पण येऊरमध्ये वाढती हॉटेलस् , ढाबे, हुक्कापार्लर आणि मद्यपींचा मध्यरात्री पर्यंतचा वावर हा येऊरमधील वन्यप्राणी जीवांना धोकादायक ठरत आहे. येऊरच्या जंगलात निवासी भागाप्रमाणे दिवसरात्रींचा वावराने “शांतिवन”चे “अशांती वन” झाल्यानेच वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. वनविभाग, पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन मात्र नियमावर नियम करण्यातच धन्यता मानीत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. वन विभागाच्या प्रवेश शुल्क नियमाच्या अंमलबजावणीने आता वनविभागाची तिजोरीला भरभराटी तर राज्य उत्पादन शुल्क विभागाला करोडोचा चुना लागत असलयाचे चित्र आहे. तसेच या अनधिकृत हॉटेल, ढाबे यांचे सोयरसुतक पालिका प्रशासनाला नाही असेच चित्र दिसत आहे.

पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिसादच नाही मिळत

येऊरच्या जंगलात आदिवासी पाड्यानी काही भाग वेढलेला आहे. तर अन्य भागात आलिशान बंगल्यानी कुठलीच कसर सोडलेली नाही. तर हिल्सस्टेशन असल्याने या भागात हॉटेल्स, हुक्कापार्लर, फर्ट, ढाबे आणि मैदानांची वेढल्याने येऊर हे “हिल्स स्टेशन” कमी आणि “फील स्टेशन” जास्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे वन्य प्राण्यांना प्रत्यक्षात अभयारण्य राहिलेच नाही. म्हणूनच रहिवाशी क्षेत्रातील लोक जंगलात आणि जंगलातील वन्यप्राणी माणसात येण्या-जाण्याच्या घटना घडत आहेत. शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे येऊर निसर्गाचे सानिध्य हरवू लागले असल्याची खंत  प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांनी व्यक्त केली आहे. पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिसादच मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

येऊरमध्ये अनधिकृत तीन हॉटेल आणि दोन ढाबे

येऊरमध्ये हॉटेल्स आणि ढाबे यांना मोठे पीक आले आहे. बेकायदेशीर हॉटेल, बेकायदेशीर मद्याची पर्वणी असलेले ढाबे तर काही ठिकाणी हुक्कापार्लर संस्कृतीही मुले धरू लागली आहे. येऊरच्या परिसरात असलेल्या परवानाधारक अधिकृत होटल्स मध्ये एक्झोस्टिका रिट्रीट, साई ढाबा आणि गोल्डन स्वान ही अधिकृत असल्याची माहिती सूत्रांची आहे. तर बॉंम्बे डक, गारवा, निवांत, आर.के. ढाबा, देशी ढाबा यांचा समावेश आहे. बेकायदेशीर ढाबे आणि हॉटेल्सचा भस्मासूर कुणाच्या आशीर्वादाने फोफावला याचे उत्तर वनविभाग, पालिका, पोलीस प्रशासनाकडे नाही. मात्र ही भस्मासूराची संस्कृती येऊरमध्ये खोलवर रुजलेली आहे. याच येऊरमध्ये रोज मद्याचा महापूर येतो. तसेच आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी महापूर येणार आहे. मात्र पालिका आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकला करोडोचा चुना लागत आहे.

येऊरमध्ये अनधिकृत धाबे, हॉटेल्स आणि हुक्का पार्लर किती आहेत याबाबत माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही. ती माहिती टाऊन प्लॅनिंग विभागाकडून घ्यावी लागेल. – चारुशीला पंडित (सहाय्यक आयुक्त,वर्तकनगर प्रभाग समिती)

येऊर परिसरात प्रवेश शुल्क हा नियम जुनाच आहे. त्याची अंमलबजावणी होत आहे. मॉर्निंगवॉकसाठी येणाऱ्या नागरिकांकडून वार्षिक १९५ रुपये घेण्यात येतात असे १ हजार लोक आहेत. तर प्रत्येकी वाहनांकडून ५० रुपये घेण्यात येत आहेत. रोज येऊरवर १०० गाड्यांची आवक जावक आहे. -राजेंद्र पवार(येऊर वनविभाग अधिकारी)

येऊरमधील अनधिकृत हॉटेल्स, ढाबे आणि फोफावू पाहणारे हुक्का पार्लर याला वनविभाग, पालिका प्रशासन आणि पोलीस, राज्यउत्पादन शुल्क यांचा आशीर्वाद? येऊरमध्ये रोज हजारो नागरिकांचे जाणे येणे, किमान ५०० गाड्यांची अवाक जावक आहे. नियमांची अंमलबजावणी नंतर वनविभागाची तिजोरी भरणार, यापूर्वी कोट्यवधींचा चुना लागला आहे. पालिका प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क यांचे लाखोंचा महसुलाचा चुना लागतोय. मात्र कारवाईची शक्यताच दिसत नाही हे दुर्दैव आहे. – स्वप्नील महिंद्रकर(तक्रारदार मनसे प्रभाग अध्यक्ष)


हेही वाचा – खुशखबर! थर्टीफर्स्टनिमित्ताने रेल्वे प्रशासनाकडून विशेष लोकल


 

First Published on: December 30, 2019 10:03 PM
Exit mobile version