गोवंडी येथे रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू

गोवंडी येथे रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू

रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू

गोवंडी येथे रिक्षा अपघातात शिना युसूफ मिर्झा या 35 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवनार पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी रिक्षाचालकास अटक केली आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता गोवंडीतील पूर्व दुतग्रती महामार्गावरील लाकडवाला इमारतीजवळील ब्रिजवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

शोबाज युसूफ मिर्झा हा तरुण गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात राहतो. आरोपी रिक्षाचालक त्यांच्या शेजारीच राहतो. शुक्रवारी रात्री तो पेट्रोल भरण्यासाठी जात होता. यावेळी त्याच्यासोबत शोबाज आणि त्याची आई शिना मिर्झा हेदेखील होत्या. भरवेगात रिक्षा चालविण्याच्या प्रयत्नात चालकाचा रिक्षावरील ताबा सुटला आणि त्याने लाकडवाला इमारतीजवळील ब्रिजवर दुभाजकाला धडक दिली. या अपघातात रिक्षा पलटी होऊन तिघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

रिक्षा चालकाला अटक

तिघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे शिना मिर्झा हिला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर इतर दोघांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी शोबाजच्या जबानीवरुन पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने रिक्षा चालवून एका महिलेच्या मृत्यूस तर स्वत:सह दोघांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत त्याला नंतर पोलिसांनी अटक केली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याला जामिनावर सोडून देण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कदम यांनी सांगितले.

First Published on: November 12, 2018 5:16 AM
Exit mobile version