नवी मुंबईत रेल्वे क्रॉसिंगचा जीवघेणा प्रकार

नवी मुंबईत रेल्वे क्रॉसिंगचा जीवघेणा प्रकार

नकातच प्रवासी एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जात असल्याचे दिसून येते.

आयकर कॉलनी व बेलापूर गाव दरम्यान रेल्वे क्रॉसिंगवर पादचारी पूल बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. ४ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून यामुळे रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात थांबणार आहेत.या पादचारी पुलाचे काम सुरु असले तरी ते पूर्ण होण्यास वेळ लागणार आहे.त्यामुळे आजही शेकडो नागरिक या मार्गाचा जीवावर उदार होऊन वापर करताना दिसून येतात.नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी तर मुलांना शाळेत जाण्यासाठीही रेल्वे रूळ ओलांडावा लागतो. यामुळे वारंवार अपघात होत असून अनेक रहिवाशांना जीव गमवावा लागला आहे.

सीवूड्स रेल्वे स्थानकाचे काम सुरु असून रेल्वे स्थानकातच प्रवासी एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जात असल्याचे दिसून येते.हाच प्रकार नेरूळ रेल्वे स्थानकातही घडत असल्याने याचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे.नवी मुंबईत प्रत्येक रेल्वे स्थानकात पादचारी पूल अथवा भुयारी मार्ग आहेत.मात्र त्यांचा वापर अभावानेच होत आहेत. अनेक नागरिक स्टेशनच्या आत अथवा बाहेर जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. ठाणे-वाशी हार्बर मार्गावर ऐरोली नाका, रबाळे, तुर्भे येथील रेल्वे फाटक रहिवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत.
सिडकोने रेल्वे स्थानके बांधल्यानंतर भुयारी मार्गही बांधणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने नवी मुंबईतील नागरिकांना धोकादायक रेल्वे क्रॉसिंग करावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ ओलांडू नका, अशा आशयाचे फलक उभारून जबाबदारी झटकली आहे.ऐरोली नाका, तुर्भे नाका, रबाळे येथील रहिवासी पूर्व आणि पश्चिमेकडे ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटकांचा वापर करतात. या रेल्वे फाटकांतून जात असताना काही ठिकाणी नेहमीच अपघात होतात.
रेल्वे प्रशासनाने ठाणे-वाशी मार्ग सुरू केला आणि सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे स्थानके बांधली.

शहराचा नियोजनबद्ध विकास करताना आवश्यक त्या ठिकाणी पादचारी पूल किंवा भुयारी मार्ग निर्माण करणे आवश्यक असताना सिडकोने मात्र रेल्वेमार्गाच्या परिसरात भुयारी मार्ग उभारण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे ठाणे-वाशी मार्गावर नागरिकांना जीव मुठीत धरून रूळ ओलांडावा लागत आहे. अनेक ठिकाणी शाळकरी मुले ये-जा करतात. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने सतर्कता म्हणून गाडी येत असल्याची सूचना देणारे फलक किवा ध्वनिक्षेपक उभारणे गरजेचे होते. मात्र रेल्वे प्रशासनाने देखील सिडकोच्या पावलावर पाऊल ठेवत असे करणे टाळले. या फाटकांच्या परिसरातून जाताना हॉर्न वाजवणे बंधनकारक करावे, अशी सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

First Published on: August 28, 2018 4:00 AM
Exit mobile version