सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिजचे डोंगर

सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिजचे डोंगर

Debridge

वाशी रेल्वे स्टेशन कांदळवण क्षेत्रालगत असलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकले जात असून त्याकडे भरारी पथकांनी दुर्लक्ष केले आहे. कांदळवन क्षेत्राजवळील सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर डेब्रिजचे डोंगर निर्माण झाले आहेत. इंदिरानगरजवळ नैसर्गिक नाल्यात भराव करण्यात आला असून, गणपती पाड्यामध्ये खदान, तलावही बुजविण्यात आला आहे आहेत.

अडवली-भुतावलीमध्ये हजारो डम्परमधून डेब्रिजचा भराव टाकण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास 50 फूट उंच टेकडी तयार झाली आहे. काही महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांनी आंदोलन केल्यानंतर तेथील अतिक्रमण काही प्रमाणात थांबले आहे. त्यामुळे डेब्रिज माफियांनी इतर परिसरामध्ये आपला मोर्चा वळवला. इंदिरानगरमधील शांताबाई जामा सुतार उद्यान व हिरादेवी मंदिर परिसरामधील नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव करण्याचे काम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या मोकळ्या भूखंडासह, पार्किंगच्या राखीव भूखंडावर, एमआयडीसी जलवाहिनीलगत, एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यालगत शेकडो डम्परमधून डेब्रिज टाकले जाते. महापालिका व एमआयडीसी प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. याचाच फायदा घेत आता डेब्रिज माफियांनी कांदळवन क्षेत्राजवळील जागेवर डेब्रिज टाकून भूखंड तयार करण्याचे काम सुरू केले आहे. वाशीतील रेल्वे स्थानकाजवळील काही भागावर मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आल्याने या भूखंडावर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसली आहे.

First Published on: April 19, 2019 4:04 AM
Exit mobile version