दिल्लीतील सराईत चोर मुंबई रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

दिल्लीतील सराईत चोर मुंबई रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात

आरोपी पलक्ष्मीकांत उर्फअनिकेत द्विवेदी

कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडीच राहते, या म्हणीप्रमाणे काही जणांची प्रवृत्ती मुळातच वाईट असते, कितीही शिक्षा भोगली तरी त्यांच्या दुष्कृत्यांमध्ये काहीच फरक पडत नाही, असाच एक चोर मुंबईत रेल्वे पोलिसांच्या तावडीत सापडला. दिल्लीच्या मेट्रो परिसरात चोर्‍या करणार्‍या या सराईत गुन्हेगारास मुंबईत येवून चोरी करताना रेल्वे पोलिसांनी पकडले. दिल्ली पोलिसांनी त्याला अनेकदा चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. लक्ष्मीकांत उर्फ अनिकेत द्विवेदी असे या भामट्याचे नाव असून दिल्लीत सराईत गुन्हेगार अशी त्याची ओळख झाली होती.

गेल्या काही दिवसांपूर्वीच द्विवेदी याला चोरीच्या एका गुन्ह्यात शिक्षेसाठी तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले होते. मात्र शिक्षा भोगून बाहेर पडताच त्याने मुंबई गाठली आणि मुंबईत चोरी करताना रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला. आरोपी द्विवेदी हा १५ दिवसांपूर्वीच चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगून दिल्लीच्या तिहार तुरुंगातून बाहेर पडला होता. दिल्ली मेट्रोमधून प्रवास करणार्‍या लोकांमध्ये तो स्वत:चे सावज हेरायचा. दिल्ली पोलिसांकडून ठिकठिकाणी त्याचे ‘वॉन्टेड’ म्हणून पोस्टर्स लावण्यात आले होते. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर दिल्ली परिसरात चोरी करणे त्याला अवघड होऊ लागले. म्हणून त्याने सरळ मुंबई गाठली आणि मुंबईत रेल्वे स्थानकांवर चोर्‍या करायला सुरुवात केली. पण मुंबईत चोरी करतानाच रेल्वे पोलिसांच्या ठाणे पथकाने त्याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धनवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चोपडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर यांच्या पथकाने ही कारवाई करुन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दादरमध्ये महागड्या लॉजमध्ये राहायचा
मुंबईत गर्दीचे रेल्वे स्थानक असलेल्या दादर स्थानकाच्या पूर्वेकडे असणार्‍या कैलास लस्सीच्या वरच्या बाजूला एका महागड्या लॉजमध्ये त्याने आपले बस्तान मांडले होते. त्याने आतापर्यंत मुंबईत एकूण ९ चोर्‍या केलेल्या आहेत. ज्यामध्ये १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून अटकेनंतर हस्तगत करण्यात आला. यामध्ये त्याच्यावर दादर स्थानकात तीन, अंधेरी स्थानकात दोन, कुर्ला स्थानकात तीन असे एकूण ९ चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होते. लोहमार्ग पोलिसांच्या ठाणे पथकाने त्याला कुर्ला रेल्वे स्थानकातून अटक केली असून त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

First Published on: December 19, 2018 4:03 AM
Exit mobile version