६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करा – भीम आर्मी

६ डिसेंबरपूर्वी दादरचे नामांतर करा – भीम आर्मी

येत्या ६ डिसेंबरपूर्वी दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ते ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस’ करावे, अशी मागणी भीम आर्मी या संघटनेनं केली आहे. यापूर्वी त्यांनी १ डिसेंबर पूर्वी दादर स्थानकाचे नामांतर करा नाहीतर आंदोलन करु असा इशारा दिला होता. मात्र, आता ६ डिसेंबर २०१८ पूर्वी दादर स्थानकाचं नामांतर करण्याची मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. येत्या ६ डिसेंबरपूर्वी या नामांतराबाबत निर्णय न घेतल्यास मुख्यमंत्र्यांना चैत्यभूमीवर पाय ठेवू देणार नाही, असा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे. दादरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी आहे, त्यांचे निवासस्थान राजगृह तसेच आंबेडकरी चळवळीचे केंद्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन देखील दादर परिसरातच असल्याचे भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे व महासचिव सुनील थोरात यांनी यावेळी म्हटले. केंद्र सरकारने दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिलमध्ये भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप या सरकारने इंदू मिलमध्ये कामाची एक विट देखील रचलेली नाही. मागील सरकारने केलेल्या कामाचे भूमिपुजन करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे .अशी टीका भीम आर्मीने केली आहे. दादर स्थानकाचे नामांतर करण्यात यावे अशी मागणी देशातील तमाम जनतेने वारंवार केली आहे. 


वाचा: ‘कोरेगाव भीमात पुन्हा दंगलीची शक्यता’


दरवर्षी ६ डिसेंबरला देशविदेशातून करोडो आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री केंद्रिय मंत्री तसेच देशविदेशातील अतिमहत्वाच्या व्यक्तीदेखील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात, त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून देशविदेशातून होत आहे. भीम आर्मीने मागील ६ डिसेंबर २०१७ व १४ एप्रिल २०१७ रोजी दादरचे प्रतिकात्मक नामांतर करून या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पत्र व्यवहारदेखील केला होता .यावेळी देखील रेल्वे प्रशासनामार्फत आला असून राज्यात ठिकठिकाणी स्टेशन मास्तर यांना निवेदनं देण्यात आली आहेत. आता पुन्हा या प्रश्नावर तमाम जनतेच्या आंदोलनाची वाट न पाहता जनतेच्या मागणीचा केंद्र तसेच राज्य सरकारने सन्मान ठेवून येत्या ६ डिसेंबरपूर्वी यासंदर्भातील निर्णय घेण्यात यावा अशी विनंती कांबळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे. 


वाचा: आणखी सात रेल्वे स्थानकांची नावं बदलणार

First Published on: December 5, 2018 2:08 PM
Exit mobile version