मुंबईत महिन्याभरात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो,गॅस्ट्रो,स्वाईन फ्ल्यू रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत महिन्याभरात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो,गॅस्ट्रो,स्वाईन फ्ल्यू रुग्णसंख्येत वाढ

संग्रहित छायाचित्र

मुंबईत एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला असतानाच पावसाळ्यातील साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. जून २०२१ मध्ये मलेरिया रुग्णांची संख्या ३५७ असताना जुलैमध्ये त्यात चांगलीच वाढ होऊन ही रुग्णसंख्या ५५७ वर गेली आहे. तर जूनमध्येच लेप्टो रुग्णांची संख्या १५ होती ती जुलैमध्ये ३७ , डेंग्यू रुग्णसंख्या १२ वरून २८, गॅस्ट्रो रुग्णसंख्या १८० वरून २९४ तर स्वाईन फ्ल्यू रुग्णांची संख्या ६ वरून २१ वर गेली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही काहीशी चिंतेची बाब आहे.

मुंबईकर गेल्या मार्च २०२० पासून जीवघेण्या व भयानक अशा कोरोनाशी दोन हात करीत आहेत. या कोरोनाचे औषध अद्याप सापडलेले नाही. अशा परिस्थितीत मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना फेब्रुवारी २०२१ मध्ये पालिकेला या कोरोनाच्या पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश आले होते. मात्र नंतर काही अतिउत्साही मंडळींच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासकीय यंत्रणेच्या काहीशा ढिलाईपणामुळे कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी २०२१ च्या मध्याला मुंबईत धडकली व रुग्णसंख्येत चांगलीच वाढ झाली. आता पुन्हा पालिकेने विविध उपाययोजना करून या दुसऱ्या लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळेच पालिकेने कोविड निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला व अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र दुसरीकडे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या लेप्टो, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, गॅस्ट्रो रुग्णांच्या संख्येत गेल्या एका महिन्यात दखल घेण्यासारखी वाढ झाली आहे. वरील आकडेवारीवरून ते निदर्शनास येत आहे. २०२० मध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मलेरियाचे ५००७ रुग्ण आढळले आणि एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. तर लेप्टोचे २४० रुग्ण आढळले व त्यामुळे ८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर डेंग्यूचे १२९ रुग्ण व ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे, गॅस्ट्रोचे २५४९ रुग्ण आणि स्वाईन फ्ल्यूचे ४४ रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत २०२१ मध्ये १ जानेवारीपासून ते जुलैअखेरपर्यंत मलेरियाचे ५५७ रुग्ण आढळले. तर गॅस्ट्रोचे – २३१८, लेप्टोचे ९६ रुग्ण ( १ मृत) , डेंग्यूचे ७७, गॅस्ट्रोचे १५७२ आणि स्वाईन फ्ल्यूचे २८ रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – Mumbai Unlock: मुंबईतील मॉल्स बंदच राहणार

 

First Published on: August 3, 2021 9:20 PM
Exit mobile version