आपला लढा आकडेवारीशी नाही, कोरोनाशी आहे – देवेंद्र फडणवीस

आपला लढा आकडेवारीशी नाही, कोरोनाशी आहे – देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी व्हर्च्युअल पत्रकार परिषद घेऊन केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या मदतीचे आकडे सांगितले होते. त्यानंतर सरकारकडूनही आकडे सांगण्याची स्पर्धा सुरु झाली. यातच शुक्रवार, दि. २९ मे रोजी सर्वाधिक रुग्ण बरे झाले हे सांगण्याच्या नादात त्याच दिवशी राज्यात सर्वाधिक मृत्यू देखील झाले होते. मात्र ही संख्या लोकांसमोर सांगितली गेली नसल्याची टीका आता देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

फडणवीस यांनी ट्विटरवर म्हटले की, “काल (दि. २९ मे) एकाच दिवशी ८३८१ रूग्ण घरी सोडण्यात आल्याचा दावा आणि मृत्यूसंख्या आजवरची सर्वाधिक ११६. रूग्ण बरे होताहेत हे दाखविण्याचा घाईत त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सुद्धा वाढतेय. आपला लढा आकडेवारीशी नाही, तर कोरोनाविरोधातील आहे, त्यावर लक्ष केंद्रीत करा, ही पुन्हा विनंती!”

काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी सरकारवर टिका करताना सांगितले होते की, देशातील एकूण रुग्णांपैकी ३३ टक्के रुग्ण महाराष्ट्रात असून त्यापैकी ४० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात झालेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची कामगिरी उत्तम कशी असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ट्विटरवर माहिती देताना सांगितले होते की, एका दिवसांत ८ हजार ३८१ रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन गेले आहेत.

 

First Published on: May 30, 2020 5:24 PM
Exit mobile version