दाऊदच्या इशार्‍यावर चालणारे हे सरकार!

दाऊदच्या इशार्‍यावर चालणारे हे सरकार!

राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. आतापर्यंत केवळ विधिमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन करणार्‍या भाजपने बुधवारी मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदान ते विधानभवन असा धडक मोर्चा काढला. पोलिसांनी या मोर्चाला मेट्रो सिनेमाजवळ अडवले. त्याआधी आझाद मैदानात कार्यकर्त्यांना संबोधित करताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार दाऊदच्या इशार्‍यावर चालत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

देशद्रोह्यांच्या विरोधात देशभक्तांचा, भारत मातेच्या सुपुत्रांचा हा संघर्ष आहे. ज्या लोकांनी मुंबईत निष्पाप जीवांना बाँम्बस्फोटात कट रचून मारले त्यांच्याशी व्यवहार करताना मलिकांना लाज वाटायला हवी. मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पेन ड्राईव्ह ही तर केवळ झलक होती, पिक्चर अभी बाकी है.. आणखी बॉम्ब ठेवलेत.. अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला.

नवाब मलिक आणि दहशतवाद्यांचा जो व्यवहार झाला, त्यामागे दाऊदची बहिण हसीना पारकर मुख्य सूत्रधार होती. या पैशांचा वापर मुंबईत 3 बॉम्बस्फोट घडविण्यासाठी झाला. या जमीन व्यवहाराच्या माध्यमातून काळ्या पैशाचा वापर करून टेरर फंडिंग करण्यात आले. या टेरर फंडिंगमध्ये महाराष्ट्रातील मंत्री मदत करतो, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना द्यावेच लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही बाळासाहेबांना उत्तर देऊ
सरकार दाऊदच्या इशार्‍यावर चालते का हा माझा सवाल आहे. दहशतवाद्यांना पैसा पुरवणारा महाराष्ट्राचा मंत्री नवाब मलिक आहे. तरीही शरद पवार त्यांचा राजीनामा घेत नाहीत, याचे आश्चर्य वाटते. उद्धव ठाकरे शांत आहेत. एक दिवस उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचे आहे. आम्ही बाळासाहेबांना उत्तर देऊ की आम्ही संघर्ष केला. तुम्ही कुणाच्या दाढ्या कुरवाळताय? नरेंद्र मोदींना संपविण्यासाठी सर्व लोक एकत्र आले पण त्यांना संपवू शकले नाही. तुम्ही आम्हाला संपविण्याचे षडयंत्र रचले. हा पहिला बॉम्ब आहे असे अनेक बॉम्ब माझ्याकडे आहेत योग्यवेळी ते फोडणार.
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

मेट्रोजवळच मोर्चाला अडवले
देवेंद्र फडणवीस यांच्या नैतृत्वात आझाद मैदानातून दुपारी निघाला. मलिकांविरोधात भाजप नेते, कार्यकर्ते एकवटले. मोर्चात भारत माता की जय, नवाब मलिक राजीनामा द्यावा अशी घोषणाबाजीही यावेळी देण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी हाती फलक व भाजपचे झेंडे घेत मार्गक्रमण केले. भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी मोठी उपस्थिती होती. मात्र विधान भवनापर्यंत जाण्याआधीच मोर्चाला पोलिसांनी मेट्रो थिएटरजवळ अडवले. त्यानंतर पोलिसांनी देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, नितेश राणे आदी नेत्यांना येलो गेट पोलीस ठाण्यात नेवून नंतर सोडून दिले.

लढाई और बाकी है
राज्यातील प्रश्नांचे सरकारला काहीही देणे-घेणे नाही. मुंबई बॉम्बस्फोटात सहभागी असणार्‍यांना मदत करणारे नवाब मलिकांना पाठिशी घालण्याचे काम हे सरकार करत आहे. जोपर्यंत सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. ये तो एक अंगडाई है, लढाई और बाकी है.
-चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप

देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवा : आशिष शेलार
विरोधकांना नामोहरम करण्याचा कट कसा रचला जातोय हे उघड करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करा, अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी यावेळी राज्य सरकारकडे केली. देवेंद्र फडणीस यांनी सादर केलेल्या पुराव्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा वापर, पोलीस यंत्रणांचा गैरवापर या सर्व बाबींचे धागे-दोरे एकमेकांशी गुंतलेले आहेत. फडणवीस यांनी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा कट देखील उलगडला आहे. एकूण पाहता हा महाभयंकर कट दिसत असल्याने फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पोलिसांनी भाजपला मोर्चा काढण्यास परवानगी नाकारली होती. त्यामुळे पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेऊन यलोगेट पोलीस ठाण्यात नेले आणि काही वेळानंतर सोडून दिले. मोर्चा मेट्रो सिनेमाकडे निघालेला असताना पोलिसांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे यांना ताब्यात घेतले.

पेनड्राईव्ह बॉम्बनंतर वकील प्रवीण चव्हाण गायब?
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण गायब असल्याचे म्हटले जात आहे. अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयाला टाळे लावल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात राज्य सरकराचे षड्यंत्र उघड केल्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा काही वृत्तवाहिन्यांनी प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. एकदा फोन उचलला परंतु त्या प्रश्नावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. त्यानंतर त्यांच्या कार्यालयावर काही पत्रकारांनी प्रतिक्रिया घेण्यासाठी धाव घेतली, असता त्यांच्या कार्यालयाला टाळे असल्याचे दिसले.

First Published on: March 10, 2022 6:30 AM
Exit mobile version