अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी फडणवीस सरकारचा ५७ लाखांचा खर्च

अखेरच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी फडणवीस सरकारचा ५७ लाखांचा खर्च

देवेंद्र फडवणीस यांची राज्य सरकारवर टीका

महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि फडणवीस सरकारच्या काळातील उधळपट्टीची आकडेवारी हळूहळू समोर येऊ लागली आहे. आता तर फडणवीस सरकारच्या काळातील शेवटच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा खर्च देखील समोर आला आहे. निवडणुकीला अवघे चार महिने उरले असतान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १६ जून रोजी मंत्रिमंडळ विस्तार केला होता. या विस्तारामध्ये आशिष शेलार यांच्यासह १२ जणांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या विस्ताराच्या खर्चाची आकडेवारी समोर आली असून, एका तासाच्या या विस्ताराच्या कार्यक्रमासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने तब्बल ५७ लाख ३० हजार ४५१ रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ही माहिती माहिती अधिकारातून मिळवली आहे.

विस्तारासाठी असा केला खर्च

नव्या १३ मंत्र्यांच्या शपथविधीसाठी तत्कालीन फडणवीस सरकारने ५७ लाख ३० हजार ४५१ रुपये खर्च केले असून, यामध्ये मंडप बांधणे, लाकडी स्टेज तयार करणे, सोफा आणि डनलॉप खुर्च्या पुरवणे यासाठी ५४ लाख ९१ हजार ४०० रुपये, विविध विद्युत विषयक कामांसाठी १ लाख ६९ हजार ८४४ रुपये, तर पुष्प सजावट करण्यासाठी ६९ हजार २०७ असे एकूण ५७ लाख ३० हजार ४५१ रुपये फडणवीस सरकारने खर्च केले होते.

या मंत्र्यांचा झाला होता शपथ विधी

विधानसभा निवडणुकीला चार महिनेच उरले असताना फडणवीस सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला होता. यामध्ये लोकसभा निवडणुकीवेळी मुलगा सुजय यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमधून बंड करणारे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईत भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे अॅड. आशिष शेलार, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले आणि बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांचा समावेश करण्यात आला होता. या तेरा मंत्र्यांमध्ये ८ कॅबिनेट तर ५ राज्य मंत्र्यांनी शपथ घेतली होती.

First Published on: February 21, 2020 7:35 PM
Exit mobile version