अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराची दुरवस्था

अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिराची दुरवस्था

अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर

अंबरनाथ येथील पुरातन शिवमंदिरात दुसऱ्या श्रावणी सोमवार निमत्त पहाटेपासूनच भाविकांची अलोट गर्दी झाली होती. पावसाने उघड घेतल्यामुळे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भाविक शिवमंदिरात दर्शनासाठी आले होते. पण मंदिरात मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. या गळतीतूनच भाविकांनी दर्शन घेत मंदिराच्या दुरवस्थेबाबत खंत व्यक्त केली. आतापर्यंत मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिराकडे लक्ष दिल्याने ‘क’ श्रेणीतून मंदिर ‘अ’ श्रेणीत गेले. आता मात्र मंदिरातील गाभाऱ्यातच गळती होत आहे. त्यामुळे येथे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. परिणामी केंद्रीय पुरातत्व खात्याने याकडे लक्ष देण्याची मागणी येथील भाविकांकडून होत आहे.

मंदिराच्या गाभाऱ्याला गळती

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. जगप्रसिद्ध असलेले हे शिवमंदिर पुरातन असून सध्या या मंदिराची दुरवस्था झाली आहे. मंदिराच्या या दुरवस्थेकडे शासन, प्रशासन, पुरातत्व विभागाचे लक्ष नसल्याची खंत भाविक व्यक्त करीत आहेत. सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसात संपूर्ण मंदिराच्या गाभाऱ्यात गळती होत असून त्या गळतीतूनच रांगेत उभे राहून भाविकांना दर्शन घ्यावे लागत आहे. शिवमंदिराची शिळा-शिल्पे जीर्ण झाली असून जगविख्यात हा प्राचीन ठेवा कोणत्याही क्षणी ढासळून धोका उद्दभवू शकतो.

मंदिराला भेगा पडल्या.

शिवमंदिर ‘अ’ श्रेणीचे धार्मिक पर्यटन स्थळ

भाविकांसाठी याठिकाणी कोणतीच सोयी-सुविधा उपलब्ध नाही. याकडे शासन, प्रशासन, पुरातत्व विभागाचे लक्ष वेधण्यासाठी गेल्या १५ वर्षापासून पुजारी विजय चाहू पाटील व रवि पाटील हे शिवमंदिराच्या प्रांगणात अखंड श्रावणमास ‘हिंदूधर्म संस्कृती संवर्धन महोत्सवा’चे आयोजन करतात. त्या माध्यमातून ‘क’ वर्गात असलेल्या शिवमंदिराचा ‘अ’ वर्गात समावेश करुन धार्मिक पर्यटन स्थळाची मागणी केली आहे.

श्रावणी सोमवार निमित्त भाविकांनी गर्दी केली होती

हेही वाचा – पूरग्रस्तांना देऊया मदतीचा हात – विनोद तावडे

पुरातत्व खात्याने मंदिराकडे लक्ष द्यावे

दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरीता संपूर्ण श्रावणमास महिना मंदिराच्या ठिकाणी विविध कार्यक्रमासह भाविकांसाठी भंडाऱ्याचे आयोजन करतात. शिवमंदिराजवळील कुंडांचीही दुरवस्था झाली आहे. कुंडांचे कठडे ढासळलेल्या स्थितीत आहेत. मंदिराच्या या दुरवस्थेबाबत शासनाला केव्हा जाग येणार? असा प्रश्न भाविक व्यक्त करीत आहेत. मंदिर परिसरात श्रावण महोत्सवानिमित्त रविवारपासून तब्बल २७ तास भजन, कीर्तन सुरू आहे. या कीर्तनाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. दुसरा श्रावणी सोमवार असल्याने त्यात पावसाचीही उघड झाल्याने मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबलच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दर्शनाची रांग आनंद दिघे चौकापर्यंत गेली होती. शिवमंदिराच्या ठिकाणी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवमंदिराच्या ठिकाणी होत असलेल्या गळतीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्रीय पुरातत्व खात्याने याकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी भक्तगणांमध्ये केली जात आहे.

First Published on: August 12, 2019 6:58 PM
Exit mobile version