धारावीकर करणार प्लाझ्मा दान…

धारावीकर करणार प्लाझ्मा दान…

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रशासनाची चांगलीच झोप उडाली. एका छोट्याशा झोपडीत पाचपेक्षा अधिकजण राहणाऱ्या या परिसरात पालिकेच्या यंत्रणांनी हे आव्हान पेलून धारावीच्या झोपडपट्टीतील कोरोनाचा संसर्ग रोखला. त्यामुळे मागील काही दिवस चिंतेने व्याकुळ असलेले हेच धारावीकर आता मात्र मुंबईकरांसाठी खंबीरपणे उभे राहणार आहेत.

कोरोनातून बरे झालेले धारावीकर आता प्लाझ्मा दान करणार असून त्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. धारावीत कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची पालिका तपासणी करणार आहे. या तपासणीत रुग्ण वैद्यकीयदृष्ट्या सक्षम ठरतील अशा व्यक्तींकडून प्लाझ्मा घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींकडून शिबिरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. हे शिबिर देशात एक वेगळा उपक्रम ठरणार आहे.

धारावीत आतापर्यंत २ हजार ४९२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यातील २ हजार ९५ रुग्ण बरे झाले आहेत. तर १४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शिबिराच्या माध्यमातून जो प्लाझ्मा मिळाला आहे त्यातून पालिका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी वापरण्यात येणार आहे.

प्लाझ्मा उपचार पद्धतीने रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं समोर आलं आहे. पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा उपचार पद्धती यशस्वी झाल्यानंतर गंभीर रुग्णांवर या थेरपीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावं, असं आवाहन पालिकेसह राज्य सरकारने केलं आहे. मात्र त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर घेऊन प्लाझ्मा उपलब्ध करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

 

First Published on: July 22, 2020 7:36 AM
Exit mobile version