CoronaVirus: धोबी समाजाला हवे कर्नाटक पॅटर्न 

CoronaVirus: धोबी समाजाला हवे कर्नाटक पॅटर्न 

कोरोनाच्या लाटेतून राज्यातील धोबी समाजाचीही सुटका झालेली नाही. हातावर पोट असणाऱ्या धोबी समाजासाठी राज्यात कर्नाटक पॅर्टन राबवण्यात यावा, अशी मागणी भारतीय धोबी समाजच्या वतीने करण्यात आली आहे. या पॅटर्ननुसार धोबींसाठी प्रत्येकी पाच हजारांचा निधी देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे समाजाचे अध्यक्ष शंकर रजक यांनी केली आहे.

राज्यात वाढत असलेल्या कोरोनाचा कहर लक्षात घेता अनेक क्षेत्राला त्याचा फटका बसला आहे. त्यात राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे धोबी समाजाला मोठा फटका बसला आहे. धोबी समाजातील अनेकांचा इस्त्री आणि कपडे धुण्याचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय संपूर्ण दिवसाच्या कमाईवर अवलंबून असतो. परंतु सध्या लॉकडाऊनमुळे धोबी समाजावर मोठे संकट आले आहे. अनेकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे काहींनी गावाचा रस्ता धरला असून अनेकांसमोर अजूनही घर कसे चालवायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे भारतीय धोबी समाज मुंबईने मदतीसाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. लॉकडाऊनच्या काळात समाजाला मदतीची गरज असून या काळातील वीज बील माफ करण्याची प्रामुख्याने मागणी यावेळी करण्यात आली आहे. त्याशिवाय अनेकांचे दुकानभाडे देखील थकले असून तेदेखील माफ करण्याची मागणी केली असल्याची माहिती रजक यांनी दिली.

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीसाठी पत्र लिहिले आहे. काही दिवसांपूर्वीच कर्नाटक सरकारने समाजातील जवळपास ६० हजार व्यक्तींना पाच हजार रुपये मदतीची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यानेही मदतनिधी द्यावा, अशी आम्ही मागणी केली असल्याचे रजक यांनी सांगितले.

First Published on: May 14, 2020 4:55 PM
Exit mobile version