धोनीला कधी निवृत्त व्हायचे हे कळते!

धोनीला कधी निवृत्त व्हायचे हे कळते!

MS DHONI

वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी रविवारी भारतीय संघाची निवड झाली. अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीने या दौर्‍यासाठी उपलब्ध नसल्याचे शनिवारी एम.एस.के प्रसाद यांच्या निवड समितीला कळवले होते. त्यामुळे त्याचा एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही. धोनीबाबत मागील काही काळात बरीच चर्चा सुरु आहे. मागील एक-दोन वर्षांत संथ फलंदाजीमुळे त्याच्यावर बरीच टीका झाला आहे. विश्वचषकानंतर तो निवृत्त होणार असे म्हटले जात होते. मात्र, त्याने निवृत्तीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. परंतु आम्ही धोनीशी संवाद साधला असून निवृत्तीबाबतचा निर्णय कधी घ्यायचा हे त्याला कळते, असे विधान प्रसाद यांनी केले.

धोनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता आणि त्याने याबाबत आम्हाला आधीच कळवले होते. मात्र, त्याची संघात निवड झाली असती का हे सांगणे अवघड आहे. आम्ही विश्वचषकापर्यंतची योजना आखली होती. तसेच विश्वचषकानंतरही आम्ही काही नव्या योजना आखल्या आहेत. रिषभ पंतला जास्तीतजास्त संधी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही धोनीशी भविष्याबाबत चर्चा केली आहे. निवृत्त व्हायचे की नाही, हा कोणत्याही खेळाडूचा वैयक्तिक निर्णय असतो. धोनीसारख्या महान क्रिकेटपटूला कधी निवृत्त व्हायचे हे कळते, असे प्रसाद पत्रकार परिषदेत म्हणाले.

अष्टपैलू विजय शंकरला दुखापतीमुळे विश्वचषकातून माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी सलामीवीर मयांक अगरवालची संघात निवड झाली. निवड समितीने संधी न दिल्यामुळे फलंदाज अंबाती रायडूने निवृत्ती घेतली, अशी चर्चा होती. याबाबत प्रसाद यांनी सांगितले, रायडूने ’थ्रीडी’बाबतचे जे ट्विट केले होते, ते अगदी योग्य वेळी केलेले ट्विट होते असे मला वाटते. मला त्याचे हे ट्विट खूप आवडले होते. त्याच्या निवडीबाबत म्हणायचे झाले तर शंकरने माघार घेतल्यानंतर संघ व्यवस्थापनाने सलामीवीराची निवड करावी अशी लेखी विनंती आम्हाला केली. आम्ही बर्‍याच खेळाडूंचा विचार केला. काही खेळाडू फॉर्मात नव्हते, तर काही खेळाडू जायबंदी होते. त्यामुळे आम्ही मयांकची निवड केली. विजय शंकर किंवा मयांक अगरवाल किंवा रिषभ पंत हे खेळाडू आम्हाला आवडतात म्हणून आम्ही त्यांची संघात निवड करत नाही. आम्हाला कोणत्याही खेळाडूला वगळण्याचा आनंद होत नाही.

First Published on: July 22, 2019 5:30 AM
Exit mobile version