मातोश्रीवर जायचे नव्हते, पण जावे लागले

मातोश्रीवर जायचे नव्हते, पण जावे लागले

Devendra-Uddhav

जभी भी कहता हूं..जय हिंद, जय महाराष्ट्र..तो जय हिंद पहिले कहता हूं.जय महाराष्ट्र बाद मे. क्यूँकी मेरे लिए मेरा देश पहिला र्है. राज्य बाद में, असे तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ठणकावून सांगणार्‍या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला. याची आठवण करुनच देण्याचे कारण एवढेच की, पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आपले ४० जवान शहीद झालेले असतानाही बाळासाहेबांचा वारस असलेले पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यात युती टिकली पाहिजे, यासाठी मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत राज्य पहिले राष्ट्र नंतर याचीच प्रचीती दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपण आज या क्षणाला मातोश्रीवर बैठकीला जाणे ठीक दिसणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर घातले होते. मात्र, मलाही मातोश्रीवर जाणे ठिक वाटत नाही. पण चर्चेसाठी अगोदरच वेळ घेऊन तेथे न गेल्यास शिवसेना भाजपमधील नसलेले गैरसमज वाढतील, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव यांच्या बैठकीला गेल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘आपलं महानगर’ला दिली.नेहमीप्रमाणे या बैठकीत एवढा उत्साह नव्हता. युती तर झालेलीच आहे. मात्र ती योग्य वेळी जाहीर केली जाईल, असेही खात्रीलायकरित्या समजते. शिवसेनेकडून उध्दवसह सुभाष देसाई तर भाजपकडून मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीला जाणूनबुझून संजय राऊत यांना दूर ठेवण्यात आल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले.

शिवसेना आणि भाजपला विसर पडल्याचे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले. काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एकीकडे संपूर्ण देश शोकाकुल असताना युतीचा बार उडवून देण्यासाठी दोन्ही पक्षांनी मातोश्रीवर चहाचे झुरके घेत बैठक केल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. राजकारणासाठी विशेष करुन युतीसाठी या सरकारच्या भावना संपल्याची टीका यावेळी विरोधकांकडून करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे, प्रकृती ठीक नसल्याने दौरा रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली आदेशाने थेट मातोश्री गाठली. त्यामुळे त्यांच्यावर यानिमित्ताने टीकेची झोड उठविली जात असून विरोधकांनी हे तर असंवेदनशील सरकार अशा कडक शब्दांत या मातोश्री भेटीचा समाचार घेतला आहे. काश्मीर येथील पुलवामा येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी भ्याड हल्यात सुमारे ४० जवान शहीद झाल्याची दुदैवी घटना गुरुवारी घडली.

या हल्ल्यात देशभरातून संतापाची लाट उसळली असतानाच गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आगामी निवडणुकीसाठी युतीच्या निर्णयासाठी थेट मातोश्रीवर बंगल्यावर पोहचले. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात सुमारे एक तासभर चर्चा झाली असून यावेळी युतीसाठी दोन्ही पक्ष सकारात्मक असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली. शिवसेना आणि भाजपाच्या या बैठकीवर सध्या सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे ४० जवान शहीद झालेले असतानाच देशभरात शोककळा पसरली होती. अशा वातावरणात आपल्या निवडणुकीचे हित लक्षात घेता युतीसाठी बैठक आयोजित करणे आणि त्यावर चर्चा करुन युती होणार असल्याचा नि:श्वास सोडतात हे वादाच्या भोवर्‍यात अडकले आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची युतीची चर्चा करण्यासाठी बैठक झाल्याने सोशल मीडियातून संताप व्यक्त केला जातोय. सोशल मिडीयात या दोघा नेत्यांच्या असंवेदनशीलपणाचा निषेध व्यक्त केला जातोय. या दोघांना देश मोठा की युतीची चर्चा मोठी?, असा प्रश्न देखील विचारला जातोय. घशाच्या शिरा ताणून-ताणून हेच राष्ट्रवाद आणि राष्ट्रप्रेमाबद्दल प्रबोधन करत असतात, अशा कठोर शब्दात यावेळी टीका केली जात आहे. तर काहीही झाले तरी आपली राजकीय पोळी भाजायची ही प्रवृत्ती राजकारणी कधी सोडतील?, हाच प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

हे सरकार जर संवेदनशील असते तर त्यांनी आपली बैठक ताबडतोब रद्द केली असती. प्रियंका गांधी यांनी आपली पत्रकार परिषद तात्काळ पुढे ढकलली. आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यापैकी मोठा हल्ला असून त्यात ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात ज्या जवानांच्या कुटुंबियांनी आपल्या मुलांना गमविले, अशा परिवारासाठी सहानभूती आणि शोक व्यक्त करण्याऐवजी हे युतीच्या मागे लागले आहेत. शिवसेनेबद्दल सांगायचे झाले तर एकीकडे चौकीदार चोर आहे, अशी ओरड करायची आणि दुसरीकडे त्यांच्याबरोबरच युती करायची हा कसला प्रकार आहे. – संजय निरुपम, मुंबई अध्यक्ष, काँग्रेस

या सरकारच्या भावनाच मेल्या आहेत का? असाच प्रश्न पडतो. देशात इतकी महत्वाची घटना घडते. अशावेळी बैठक ताबडतोब रद्द करायला हवी होती. राजकारण चालूच राहणार आहे. पण जवान एका भ्याड हल्ल्यात शहीद होतात आणि तुम्ही बैठका करत आहात. आज जर इंदिरा गांधी असत्या तर फौज घुसली देखील असती पाकिस्तानात आणि त्यांनी सर्वांना दाखवून दिले असते. – बाळा नांदगावकर, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

First Published on: February 16, 2019 5:45 AM
Exit mobile version