अग्निशमन दलासाठी डिजिटल रेडिओ मोबाइल

अग्निशमन दलासाठी डिजिटल रेडिओ मोबाइल

डिजिटल रेडिओ मोबाइल

मुंबई अग्निशमन दल अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज होत असून, आतापर्यंत सध्यःस्थितीत वापरण्यात येणारे वॉकीटॉकी आता कालबाह्य ठरल्याने डिजिटल वॉकीटॉकी अर्थात डिजिटल रेडिओ मोबाइल खरेदी करण्यात येत आहेत. तब्बल ५०० वॉकीटॉकी बदलण्यात येत असून, या डिजिटल वॉकीटॉकीमुळे जवान, अधिकार्‍यांमधील संवादाची रेंज वाढणार आहे.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलात सध्या व्ही.एच.एफ प्रणालीवर आधारित अ‍ॅनेलॉग प्रकारच्या बिनतारी संदेश वहन यंत्रणांचा वापर केला जात आहे. वापरात असलेले हे बिनतारी संच दोन दशक जुने झाले आहेत, तसेच ही यंत्रणा कालबाह्य ठरल्याने याचे सुटे भागही बाजारात सहजतेने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे याची दुरुस्ती व देखभाल वेळेत करता येत नसल्याने अनेक संच दुरुस्ती व देखभालीअभावी बंद पडून आहेत.

काळबादेवीतील गोकूळ निवास येथील आगीच्या दुर्घटनेनंतर याची चौकशी करता नेमण्यात आलेल्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या सत्यशोधन समितीनेही बिनतारी संदेश वहन यंत्रणा सक्षम करण्याची शिफारस केली होती. त्याप्रमाणे भारत सरकारच्या धोरणानुसार अ‍ॅनेलॉग ऐवजी डिजिटल प्रणाली वापरण्यावर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगानेच अग्निशमन व आग विझवण्याच्या कार्यादरम्यान डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असलेले डिजिटल मोबाइल रेडिओ (डी.एम.आर)प्रणालीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अग्निशन दलातील जवान आणि नियंत्रण कक्षात ५०० वॉकीटॉकी संच आहेत. ते बदलून डी.एम.आर प्रणाली अंतर्गत संचाची खरेदी केली जात आहे

जुने संच कालबाह्य झाल्याने नवीन डिजिटल मोबाइल रेडिओची खरेदी करण्यात येत आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वर्कस्टेशनसह मोबाईल हँडसेट आदींचा यामध्ये समावेश आहे. अत्याधुनिक पध्दतीचे असल्याने जवान आणि अधिकार्‍यांमध्ये स्पष्ट संवाद होईल,असे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केले.

सध्या वापरात असलेल्या अ‍ॅनेलॉग प्रकारची बिनतारी संदेश वहन यंत्रणांच्या संचामध्ये स्पष्ट संवाद ऐकालय मिळत नव्हत, तसेच या संचामध्ये एकावेळी एकाशीच संवाद साधता येत होता, पण त्या तुलनेत डिजिटल मोबाइल रेडिओ संचाचा वापर केल्यास स्पष्ट संवाद होईल. शिवाय एकाचवेळी अनेक लोकांशी संवाद साधता येऊ शकतो. याशिवाय जास्त अंतरापर्यंत याचा वापर होऊ शकतो,असे अधिकार्‍यांकडून समजते.

First Published on: February 17, 2019 4:20 AM
Exit mobile version