मालमत्तेचे नुकसान झाले तरी चालेल, पण जीव वाचवा, मुख्यमंत्री शिंदेंकडून Disaster Management आढावा

मालमत्तेचे नुकसान झाले तरी चालेल, पण जीव वाचवा, मुख्यमंत्री शिंदेंकडून Disaster Management आढावा

 

मुंबई: एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जिवीतहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहिम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी चोवीस तास फोन सुरु ठेवावेत. disaster management आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व यंत्रणांच्या मान्सूनपूर्व तयारीबाबत सर्वंकष आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह लष्कर, नौदल, हवाई दल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरफ, मध्य व पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय हवामान खात्याचे, गृह तसेच विविध विभागाचे सचिवस्तरीय अधिकारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी दृकश्राव्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित अधिकारी तसेच सर्व विभागीय आयुक्तांकडून आपत्ती प्रतिसाद व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी विभागनिहाय आपत्ती जोखीम तसेच त्याअनुषंगाने तयारी करण्याबाबत महत्वपूर्ण असे निर्देशही दिले. ते म्हणाले, आपत्ती प्रवण भागाचे आधुनिक तंत्रज्ञानाने डिजीटल मॅपींग करा. प्रतिसाद आणि शोध-बचाव आणि सुटका यासाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणांची मदत घ्या. यापूर्वीच भूस्खलन झालेल्या भागातील नागरिकांशी संवाद साधा. पुन्हा काही लोक त्या भागात रहिवासासाठी गेले असतील, तर त्यांची माहिती घ्या. भूस्खलन, दरडी आणि जमीनीच्या अनुषंगाने होणाऱ्या हालचाली या भागातील नागरिकांना माहित असतात. त्याबाबत त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे स्थलांतर आणि पुनर्वसनाबाबत आतापासूनच तयारी करा, असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

अन्न-धान्य, औषधांचा साठा करा

बहुउद्देशीय सभागृहे, शाळां किंवा तत्सम निवारे उपलब्धता याबाबत तयारी करून ठेवावी. याठिकाणी आवश्यक अन्न-धान्य तसेच औषधांचा साठा याबाबत संबंधित विभागांना आतापासूनच काळजी घ्यावी. पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावात आतापासूनच औषधांचा पुरेसा साठा राहील, असे पहावे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणीही तयारी ठेवा. संर्पदंशावरील लसी उपलब्ध राहतील, याची खात्री करा. वीज पुरवठा सुरळीत राहील यासाठी महावितरणने सतर्क राहणे आवश्यक आहे. एनडीआरएफ, एसडीआरफशी संपर्क-समन्वय राखा. हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या इशाऱ्यांबाबत सतर्क रहा. जीवरक्षकांची आवश्यकता भासल्यास त्यांची मानधन तत्वावरही नेमणूक करण्यात यावी. पावसाळा सुरु होण्यापूर्वीच राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेण्यात यावी. पंढरपूरला विशेष निधी दिला आहे. आषाढ वारीपूर्वी या रस्त्यांची दूरुस्ती व्हावी याकडे लक्ष द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट
बैठकीत मुंबईतील २२६ धोकादायक इमारतींपैकी २७ इमारतीतील रहिवाश्यांना स्थलांतरित केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील सर्वच महापालिकांनी धोकादायक इमारतींचे त्रयस्थ अशा चांगल्या अभियांत्रिकी संस्थांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या अहवालावर अवलंबून राहू नये. यामुळे भविष्यातील जिवीतहानी टाळता येईल. स्थलांतरित केलेल्या कुटुंबांची निवासाची काळजीही घेण्यात यावी. जेणेकरून ते धोकादायक इमारतीतून बाहेर पडण्यासासाठी तयार होतील.

नालेसफाईवर लक्ष द्या, बांधकामांचा राडारोडा-खरमाती हटवा
नालेसफाईवर आतापासूनच लक्ष द्या, असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईबरोबरच अन्य ठिकाणीही नाले सफाईवर चांगल्या पद्धतीने लक्ष दिल्यास सखल भागात पाणी साचून होणारे नुकसान टाळता येईल. काही अंशी पुराचा धोका टाळता येईल. मुंबईत रेल्वे आणि महापालिकेने नाले सफाईबाबत संयुक्त मोहिम राबवावी. त्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय आणि संपर्क राखावा. सखल भागात पाणी तुंबू नये यासाठीच्या उपाययोजनांवर लक्ष पुरवण्यात यावे. विविध यंत्रणांकडून सुरु असलेल्या बांधकांमातील राडारोडा-खरमाती वेळीच हटवण्यात यावी. काही कामांच्या ठिकाणी बांधकाम सुरक्षित टप्प्यांपर्यंत (सेफ-लेव्हल) पोहचेल, याची दक्षता घ्यावी. मुंबई उपनगरातील दरडी कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी करावयाच्या उपाययोजनांबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून, प्रस्ताव देण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

विविध दल, यंत्रणांसाठी आवश्यक सामुग्री तत्काळ उपलब्ध करा
एनडीआरएफ, एसडीआरफ तसेच लष्कर, नौदल, हवाईदल यांच्या मागणीनुसार आपत्ती व्यवस्थापनात जिवीतहानी होऊ नये शोध आणि बचाव मोहिमेसाठी आवश्यक अशी उपकरणे तत्काळ उपलब्ध होतील यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिले. ठाणे, येथे एनडीआरएफसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि कोल्हापूर या भागात जागा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून पावसाळ्यापूर्वीच या दलाचे तळ तेथे प्रभावीपणे कार्यरत होतील, असे निर्देशही देण्यात आले.

जलसंपदा विभागाने काळजीपूर्वक नियोजन करावे
पावसाळ्यात जलसंपदा विभागाचे महत्वाची भूमिका असते. त्यामुळे या विभागाने आतापासूनच सतर्क राहावे. कोल्हापूर-सांगली भागातील पूराबाबत कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या यंत्रणेशी संपर्क-समन्वय राहावा यासाठी राखावा यासाठी काळजीपूर्वक नियोजन करावे. संबंधित नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुक्ष्म नियोजन करावे. नागपूर विभागाने मध्यप्रदेशातील संजय सरोवरातून होणारा विसर्ग आणि तेलंगणातील मेडीगट्टाची पातळी याबाबत संपर्क-समन्वय राखावा. ज्यामुळे गडचिरोली आणि अन्य परिसराला पाण्याचा फटका बसणार नाही.
मराठवाड्यात वीज कोसळून होणाऱ्या मृत्युंबाबत वीज कोसळण्याचा इशारा देणारी –लायटनिंग अलर्टबाबत संबंधित सर्वच विभागांनी वेळेत कार्यवाही करावी. जेणेकरून लोकांना वेळेत इशारा मिळेल आणि जिवीतहानी टळेल.

लष्कर, नौदल, हवाईदल, पोलिसांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
महाराष्ट्रतील आपत्तीच्या परिस्थितीत विशेषतः पूर, वादळ या आपत्तीमध्ये एसडीआरएफ, एनडीआरआफच्या बरोबरीनेच या तीनही दलांनी वेळोवेळी विशेष सहकार्य केल्याचे आणि उत्तम कामगिरी बजावल्याचे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले. राज्याचे पोलिस दलही अशा आपत्तीच्यावेळी प्रतिसाद देण्यात सर्वात पुढे राहत असल्याचे कौतुकोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी या दलांतील जवानांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याचे आणि जवानांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावल्याचा अनुभव आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या महापुरात मध्यरात्री एका गर्भवती मातेने दुरध्वनीवरून मदतीची याचना केली होती. त्यामध्ये या सर्वच दलांच्या सहकार्यामुळे तिला वेळेत रुग्णालयात दाखल करता आल्याची आठवणही सांगितली. लष्कर, नौदल, हवाई, तटरक्षक दल, एनडीआरएफ, रेल्वे यांनीही पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व ती तयारी केल्याची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. एनडीआरएफची १८, एसडीआरएफची सात पथके, नौदलाची १० पथके, तटरक्षक दलाची ६ पथके, हवाई दलाची मिग ७० हेलीकॉप्टर्स, तसेच या सर्वच पथकांकडे बोटी,उपकरणे अनुषंगीक गोष्टींची सज्जता असल्याची माहिती देण्यात आली.

मुंबईतील परिस्थितीबाबत रेल्वे, महापालिकेला दक्षतेच्या सूचना

महापालिकेची तयारी

मुंबईतील परिस्थितीवर महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून ६ हजार ४०० कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाळ्यातील १५ जून ते १५ ऑक्टोबर या काळातील मोठी भरती (हाय टाईड) च्या ५६ दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन अधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे. जे खड्ड्यांची माहिती मिळताच, पुढच्या सहा तासात खड्डे बुजवतील, असे नियोजन आहे. पाणी तुंबू नये यासाठी सुमारे ५०० पंप्स सज्ज ठेवण्यात आले आहेत. सखल भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्य रेल्वेचे महाबंधक नरेश लालवाणी व पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक अशोक मिश्रा, कोकण रेल्वेच्या वतीनेही पावसाळ्यापुर्वीचे सर्वेक्षण व लोहमार्गांवर लक्ष ठेवण्याबाबत केलेल्या तयारीबाबत माहिती देण्यात आली, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.

 

 

First Published on: May 29, 2023 7:06 PM
Exit mobile version