डेबिट कार्डची गोपनीय माहिती काढून पैशांचा अपहार

डेबिट कार्डची गोपनीय माहिती काढून पैशांचा अपहार

व्हिसा आणि मास्टर कार्ड्स पाठोपाठ रूपेची वाढती लोकप्रियता

डेबिट कार्डची गोपनीय माहिती काढून बँक खात्यातून सुमारे पन्नास हजार रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी डी.एन.नगर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या भामट्याचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संयुक्तपणे शोध घेत आहेत.

राधाकृष्णन गुरुस्वामी पिल्लई हे अंधेरीतील डी.एन.नगर, अभिनय सह्याद्री सहकारी सोसायटीमध्ये त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचे स्टेट बँकेत एक खाते असून गेले दहा वर्षांपासून ते दैनंदिन कामासाठी याच बँकेतून व्यवहार करतात. त्यांच्या मालकीचे घर पुनर्विकास इमारतीमध्ये गेल्याने त्यांना बिल्डरने अकरा महिन्यांचे भाडे म्हणून दीड लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. 12 डिसेंबरला त्यांना अंकितकुमार नावाच्या एका व्यक्तीने फोन करुन तो एका फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यांना पर्सनल लोनची गरज आहे का अशी विचारणा केल्यानंतर राधाकृष्णन यांनीही त्याला तीन लाख रुपयांच्या कर्जाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांच्या डेबीट कार्डसह ओटीपी क्रमांकाची माहिती घेतली.

ही माहिती मिळताच अवघ्या काही अर्ध्या ते एक तासात त्यांच्या बँक खात्यातून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे दहा व्यवहार झाले. या अज्ञात व्यक्तीने पन्नास हजार रुपयांचा अपहार करुन राधाकृष्णन पिल्लई यांची फसवणूक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांचा डेबीट कार्ड ब्लॉक केले. या घटनेनंतर त्यांनी डी.एन.नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांच्या सुचनेनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोलनकर हे करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

First Published on: December 1, 2018 4:20 AM
Exit mobile version