मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही अत्यावश्यक सेवा असलेले मुंबईतील दवाखाने बंदच!

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही अत्यावश्यक सेवा असलेले मुंबईतील दवाखाने बंदच!

प्रातिनिधिक छायाचित्र

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यात ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू केली. मात्र, त्या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवा असलेल्या डॉक्टर, मेडिकल, क्लिनिक, भाजीपाला, किराणा, बेकरी यांना वगळण्यात आले होते. तरीदेखील मुंबईतील सर्वच्या सर्व डॉक्टर्सचे दवाखाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवेत गणल्या गेलेल्या डॉक्टर्सच्या डिस्पेन्सरीही बंद असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचं दिसून आलं आहे. साधा ताप, खोकला, सर्दी किंवा अंगदुखी असली, तरी सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर घरातल्यांसह बाजूला राहात असलेले शेजारीही घाबरून जात आहेत. मात्र, साध्या ताप-खोकल्यासाठी आपल्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क केला असता ते डॉक्टर मात्र सरकारी जीआरचा आधार घेत ‘सरकारने सर्व बंद करायला सांगितलं आहे’ असं सांगत ‘रुग्णांना तपासायचं तर सोशल डिस्टन्सिंग पाळायचं कसं?’ असा सवाल करत आहेत.

‘डॉक्टरांकडे घोळक्याने जाऊ नका’

‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधिंना असं निदर्शनास आलं की जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले आणि आसपासच्या परिसरातील बहुतांश दवाखाने सोमवारी रात्रीपासूनच बंद आहेत. या बाबतीत मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉक्टर्स, मेडिकल आणि नर्सेस यांना या संचारबंदीतून वगळल्याचं सांगितलं. ‘डॉक्टरांनी आपले दवाखाने रुग्णांसाठी उघडे ठेवलेच पाहिजेत, माझ्याकडेशी अशाच प्रकारच्या काही तक्रारी दाखल झाल्या असून याबाबत मी आमच्या अधिकाऱ्यांना आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी याबाबत चर्चा करून मुंबईतील दवाखाने उघडे राहतील यासाठी प्रयत्न करतो’, असेही आयुक्तांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितलं. मात्र, ‘पेशंटसोबत अजून एखादाच नातेवाईक जाणं अपेक्षित असून घोळक्याने आणि गर्दी करून डॉक्टरांकडे जाऊ नये’, असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

संचारबंदीत कर्मचारी दवाखान्यात कसे पोहोचतील?

या बाबतीत विलेपार्ले येथील दोन डॉक्टरांकडे अधिक चौकशी केली असता ‘सरकारने संचारबंदी लागू केली आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात संचारबंदी होती, पण काल संध्याकाळी देशभरात संचारबंदी लागू केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं आहे. डॉक्टर म्हणून मी डिस्पेन्सरीत येईन, पण माझा कम्पाऊंडर, नर्स हे सर्व संचारबंदीमुळे दवाखान्यात कसे पोहोचतील?’ असा सवाल देखील एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर केला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार जनतेला ‘अत्यावश्यक सेवा मिळतील, त्यांचा तुटवडा होणार नाहीत, त्या बंद होणार नाहीत’ असं आश्वासन देत असले तरी, प्रत्यक्षात मात्र अत्यावश्यक सेवांमध्ये सगळ्यात महत्वाचे असे डॉक्टर्सच दवाखाने बंद ठेवत असतील तर सरकारच्या सूचनांचा, घोषणांचा, आश्वासनांचा उपयोग काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.


CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद? गोंधळ उडालाय? इथे वाचा!
First Published on: March 25, 2020 12:13 PM
Exit mobile version