नवजात बालकांची कचऱ्यात विल्हेवाट

नवजात बालकांची कचऱ्यात विल्हेवाट

प्रातिनिधिक फोटो

कळंबोली येथील एमजीएम रूग्णालयात कमी कालावधीत बाळंत झालेल्या महिलांच्या मृत बालकांची थेट कचर्‍यात विल्हेवाट लावण्याचे प्रकार घडत आहेत.गुरूवारी पारगाव येथील मेहर कुटुंबियांनी हा प्रकार उघडकीस आणला.अनेकदा गर्भाशयातील पाणी कमी झाल्याने कमी कालावधीतच महिला बाळंत होतात. किंवा त्रास होत असल्याने तसेच आईच्या जीवाला धोका असल्याने डॉक्टरही औषधे देवून कृत्रिम कळा आणतात. आईला धोका होऊ नये म्हणून शस्त्रक्रिया करून अगोदरच डिलेव्हरी करतात. यामध्ये बालकाचे वाचण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आईचा जीवाकडे विशेष लक्ष दिले जाते. शंभरात 95 टक्के बालकांचे मृत्यू होतात.

मृत्युमुखी पडलेल्या बालकांच्या मृतदेहाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे ही बाब त्याचे आई-वडिल आणि कुटुंबियांच्या भावनाशी संबधीत असते. मात्र कळंबोली येथील एमजीएम रूग्णालयात अशा प्रकारे मृत्यू होणार्‍या बालकांना बायोमेडिकल वेस्टमध्ये टाकून दिले जाते. त्या मृत्यदेहाची विल्हेवाट तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कचर्‍याबरोबर करते.

एमजीएम हे लहान मुलांचे असल्याने या ठिकाणी अशा अनेक डिलेव्हरी होतात. आणि व्यवस्थापन मृतदेह कचर्‍यात फेकून देत असल्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. पारगाव येथील सरस्वती प्रफुल्ल मेहेर यांची पाचव्या महिन्यातच डिलेव्हरी करावी लागली. त्यामुळे गर्भात असलेल्या जुळया बालकांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची मागणी कुटुंबियांनी केली. सकाळी ते ताब्यात दिले जातील असे रूग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र रात्री आलेले डॉक्टर आणि इतर कर्मचार्‍यांनी ते नेहमीप्रमाणे कचर्‍यात फेकून दिले.

सकाळी सर्वजण ते नेण्याकरीता रूग्णालयात आले तेव्हा त्यांना हा प्रकार समजला. त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल शर्मा यांना जाब विचारला. त्यावेळी, इतक्या लहान बालकांचे तुम्ही अंत्यसंस्कार करणार कसे असा उलट प्रश्न त्यांनी केला. नियमानुसार ते देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. मग ते कचर्‍यात टाकण्याचा कायदा आहे का असा प्रतिसवाल केल्यानंतर डॉ.शर्मांची बोलती बंद झाली. तसे होते तर मग नातेवाईकांना सकाळी बोलवले कशाला अशी विचारणासुध्दा त्यांनी केली. आमच्या स्टाफमध्ये समन्वय नसल्याने ही चूक झाल्याचे डॉ. शर्मा यांनी मान्य केल्यानंतर वातावरण काही प्रमाणात निवळले. ज्याच्यावर हा प्रसंग येतो त्याला त्याचे दुःख समजते. रूग्णालयाला त्याचे काय अशी संतप्त प्रतिक्रिया प्रफुल्ल मेहेर यांनी दिली.

First Published on: October 27, 2018 12:10 AM
Exit mobile version