यंदाच्या दिवाळीत आवाजाचं प्रमाण कमी, पण हवा प्रदूषित!

यंदाच्या दिवाळीत आवाजाचं प्रमाण कमी, पण हवा प्रदूषित!

दिवाळी प्रदुषणमुक्त, ध्वनीप्रदूषणमुक्त साजरी व्हावी, यासाठी अनेकदा जनजागृती केली जाते. पण, गेल्या काही वर्षात केलेल्या जनजागृतीमुळे ध्वनीप्रदूषणात घट झाल्याचा अहवाल आवाज फाउंडेशनने दिला आहे. आवाज फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे, यंदाही फटाक्यांच्या आवाजावर एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, मुंबईकरांनी यंदाची दिवाळी थोड्या प्रमाणात का होईना ध्वनीप्रदुषण मुक्त साजरी केल्याचं म्हटलं आहे.

१२ पर्यंत फोडले फटाके

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपुजनाला मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. याच दिवशी मुंबईतील काही महत्त्वाच्या ठिकाणचा आवाज फाउंडेशनकडून सर्व्हे केला गेला. ७ नोव्हेंबर २०१८ या तारखेला जाहीर केलेल्या अहवालानुसार, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या रात्री १० पर्यंतची डेडलाईन असूनही मुंबईकरांनी रात्री १२ पर्यंत फटाके फोडले. पण, रात्री १२ च्या आसपास फोडलेल्या फटाक्यांचा आवाज हा १० पर्यंत फोडलेल्या फटाक्यांपेक्षा जास्त होता.

मरिन ड्राइव्हवर जास्त फटाके फोडले

मुंबईच्या मरिन ड्राइव्ह परिसरात फोडण्यात आलेल्या फटाक्यांच्या आवाजाची पातळी ही १०० डेसिबलच्या वरच असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यावर्षी ११४.१ डेसिबल एवढ्या आवाजाची पातळी फटाक्यांच्या आवाजाने गाठली आहे. पण, हे फटाके पोलीस परिसरात उपस्थित असूनही फोडण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ११७ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद करण्यात आली होती.

आवाज फाउंडेशनच्या अहवालानुसार, रात्री १० वाजेपर्यंत

वेळ                         परिसर                    आवाजाची पातळी
९.५५ (रात्री)              मरिन ड्राइव्ह                ११४.१ डेसिबल
१०. ०० (रात्री)            इस्लाम जिमखाना           ११२. ४ डेसिबल
८ ते ९ पर्यंत (रात्री)       कार्टर रोड                  १०७. ७ डेसिबल
९. ०५ (रात्री)             वरळी सी लिंक              १०९. १ डेसिबल
९.१५ (रात्री)              वरळी सी लिंक              १०६. ५ डेसिबल
९.२० (रात्री)              वरळी सी लिंक              १०९. ० डेसिबल

“दिवाळीच्या आधीपासूनच मुंबईत ध्वनीप्रदूषण कमी झालं असल्याचं गेल्या काही वर्षांमध्ये समोर आलं आहे. शिवाय, फटाके फोडण्याचं प्रमाण कमी झालं आहे. ध्वनी प्रदूषण करण्याचा हा जो काही कमी झालेला ट्रेंड आहे. तो यावर्षीही तसाच पाहायला मिळाला. वारंवार होणाऱ्या जनजागृतीमुळे यंदाच्या वर्षी फटाक्यांच्या आवाजाची पातळी कमी आहे. शिवाय, मुंबईकरांनी बॉम्ब, किंवा आवाज करणारे फटाके कमी प्रमाणात फोडले आहेत.” – सुमायरा अब्दुलली, आवाज फाउंडेशन, अध्यक्ष

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन

तसंच, दिवाळीच्या दिवशी मरीन ड्राईव्हवर पोलिसांनी १० वाजेपर्यंतच फटाके फोडू दिलेत. काही प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन झालं असलं तरी, पोलिसांनी १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. यंदा ११४.१ डेसिबल एवढ्या आवाजाची नोंद करण्यात आली आहे जी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी ११७. ८ डेसिबल एवढा आवाज नोंदवण्यात आला होता. यंदा दिवाळी जरी ध्वनीप्रदुषणमुक्त साजरी झाली असली तरी हवेच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात भर झाली असल्याचा अहवाल ‘सफर’ या हवेच्या गुणवत्ता नोंदवण्याऱ्या प्रणालीने दिला आहे.

सफर संस्थेच्या अहवालानुसार

फटाक्यांचं प्रमाण जरी कमी असलं तरी एकामागून एक फुटलेल्या फटाक्यांमुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची पातळी खालावली. गुरुवारी हवेची गुणवत्ता ३०८ एक्यूआय निर्देशांक एवढा नोंदवला गेला असून ही हवा अतिशय वाईट दर्जाची आहे. पाडव्याच्या दिवशी अंधेरी या भागात तीव्र प्रदूषण झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तर, भांडूप, कुलाबा, चेंबूर या परिसरात हवेचा मध्यम स्वरुपाचा दर्जा देण्यात आला. मालाड, माझगाव, नवी मुंबईत अतिशय वाईट हवेचा निर्देशांक देण्यात आला. वरळी, बीकेसी या ठिकाणी वाईट हवेची नोंद करण्यात आली.

First Published on: November 8, 2018 8:34 PM
Exit mobile version