नेरूळ व ऐरोली मधील रुग्णालयांना दिवाळीचा मुहूर्त

नेरूळ व ऐरोली मधील रुग्णालयांना दिवाळीचा मुहूर्त

diwali occasion

नेरूळ व ऐरोली मधील मनपा रुग्णालये बांधून सज्ज असली तरी ते सेवेत हजर नसल्याने याचा पूर्ण भार वाशीतील मनपा रुग्णालयावर पडला आहे. तोच भार कमी करण्यासाठी आता मनपाला दिवाळीचा मुहूर्त मिळाला असून दिवाळीनंतर नेरूळ आणि ऐरोली येथील प्रत्येकी १०० खाटांची रुग्णालये सुरू होणार आहेत.पालिकेच्यावतीने २२० प्रशिक्षित नर्सेसची ऑनलाइन नोकरभरती सुरू आहे. ४६ डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांनी रुग्णालयांमध्ये हजेरी लावली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात केवळ बाह्यरुग्ण विभागावर चालणारी ही रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. ही रुग्णालये सुरू झाल्याने पालिकेच्या वाशी येथील मध्यवर्ती सार्वजनिक रुग्णालयावर येणारा ताण कमी होणार आहे

नवी मुंबई पालिकेने चतुर्थस्तरीय आरोग्य सेवा उभारली आहे. यात २१ नागरी आरोग्य केंद्रे, तीन माता-बाल रुग्णालये असून यातील ऐरोली व नेरूळ येथील माता बाल रुग्णालयांचा बदल १०० खाटांच्या प्राथमिक रुग्णालयात करण्यात आला आहे. सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करून ती बांधण्यात आली आहेत. मात्र रुग्णालयात वाहिन्यांद्वारे ऑक्सिजन पुरवठा तरतूद करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ती असून नसल्यासारखी होती. मध्यंतरी राजकीय कुरघोडीमुळे या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने काही वैद्यकीय सेवा कार्यान्वित करण्यात येत आहेत. रुग्णालयासाठी कर्मचारी, नर्सेस, ब्रदर्स आणि डॉक्टरांची भरती सुरू आहे.

काही तांत्रिक कारणांमुळे ऐरोली आणि नेरूळ येथील रुग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास विलंब लागला. पण आता नर्सेस आणि डॉक्टरांची भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याने लवकरच दोन्ही रुग्णालये सुरू करण्यास प्राधान्य देणार आहे.
-डॉ. रामास्वामी, आयुक्त, नवी मुंबई पालिका

First Published on: October 22, 2018 1:28 AM
Exit mobile version