डॉक्टरांना देवदूत का मानतात? वाचा ही घटना!

डॉक्टरांना देवदूत का मानतात? वाचा ही घटना!

कोरोनासारख्या महामारीच्या काळात डॉक्टर बांधव अक्षरशः सीमेवरील एका योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. तर दुसरीकडे डॉक्टरांना मिळालेली ‘देवदूत’ ही पदवीही तितकीच रास्त असल्याचे कल्याणच्या मिरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दाखवून दिले आहे. एका गरीब महिलेची शस्त्रक्रिया तातडीची असताना आणि तिच्याकडे पैसे नसताना इथल्या डॉक्टरांनी मोफत शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले. इतकंच नाही, तर डॉक्टरांनी पैसे काढून त्या महिलेच्या औषधाचाही खर्च उचलला. डॉ. नितीन झबक आणि डॉ. अनिता मॅथ्यू यांनी त्या महिलेवर मोफत शस्त्रक्रिया करत माणुसकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवले.

काय झालं होतं?

कल्याणला राहणारी एक गरीब महिला पोटात प्रचंड दुखत असल्याने मीरा रुग्णालयात आली होती. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत मिसकॅरेजमुळे पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिला त्रास असल्याचे आणि तातडीने शस्त्रक्रिया करण्याचे डॉ. नितीन जबक यांनी सांगितले. मात्र, जवळ पैसे नसल्यामुळे शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेत ही महिला तशीच निघून गेली. ही पोटदुखी या महिलेच्या जीवावर बेतू शकते आणि पैशांमुळे तिने शस्त्रक्रियेला नकार दिल्याचे डॉक्टरांना समजले. आणि या महिलेला होणारा त्रास डॉक्टरांनाच पहावला गेला नाही. माणसाच्या रूपातील या देवमाणसांनी या महिलेला तातडीने बोलवून घेत एकही रुपया न घेता ही शस्त्रक्रिया केली आणि तिला जीवदान दिले.

याशिवाय मिरा रुग्णालयाचे डॉक्टर गौतम गणवीर यांनी रुग्णालयाचे संपूर्ण बिल माफ तर केलेच, त्याशिवाय या सर्व डॉक्टरांनी नव्हे तर देवदूतांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढत या महिलेच्या औषधांचीही व्यवस्था उपलब्ध करून दिली. डॉक्टरांना देवदूत किंवा देवमाणूस का म्हटलं जातं याची पुन्हा प्रचिती सर्वांनाच आली. विश्वकर्मा कुटुंबियांनीही डॉक्टरांचे आभार मानले आहे.

First Published on: May 10, 2020 12:13 AM
Exit mobile version