Corona: पालिकेची नियमावली; चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही

Corona: पालिकेची नियमावली; चाचणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज नाही

कोरोनाची चाचणी करण्यासाठी आता डॉक्टरच्या चिठ्ठीची आवश्यकता नसल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता खासगी प्रयोगशाळांमध्येही विना प्रिस्क्रिप्शन चाचणी करता येणार आहे. आत्तापर्यंत खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी बंधनकारक होती. यासंबंधी अनेक वादही निर्माण झाले होते. मात्र आता पालिकेच्या नव्या नियमावलीनुसार, कोरोनाची लक्षणे असलेल्यांना खासगी प्रयोगशाळेतही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय चाचण्या करता येणार आहेत.

या पुढे प्रयोगशाळेपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतर आजारांच्या व्यक्तींच्या चाचण्या घरी जाऊन करण्याची मुभाही पालिकेने खासगी प्रयोगशाळांना दिली आहे. कोरोनाच्या निदानासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या आणि पुरेसे संचही उपलब्ध असल्याने अधिकाधिक चाचण्या करण्यात याव्या. तसेच खासगी प्रयोगशाळांवरील नियमही शिथिल करत चाचण्या खुल्या कराव्यात, असे आदेश केंद्रीय आरोग्य विभागाने दिले आहेत. यानुसार, चाचण्या करण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

यासंबंधी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी माहिती देताना सांगितले की, विलगीकरण केंद्रामध्ये असलेल्या रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींच्याही घरी जाण्यापूर्वी चाचण्या केल्या जाणार आहेत. जेणेकरून या व्यक्तींना लक्षणे नसली तरी संसर्गाचे निदान केले जाईल. यामुळे ते घरी परत गेल्यावर संसर्ग प्रसाराचा धोका टळेल. तसेच ज्येष्ठ व्यक्ती आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर आजार असणाऱ्या व्यक्तींच्याही चाचण्या केल्या जातील.

हेही वाचा –

लोकलचा अंदाज चुकला, दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू  

First Published on: July 7, 2020 1:52 PM
Exit mobile version